

पणजी : वेदांता खाण कंपनीस खनिज वाहतूक करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाने खाण वाहतूक थांबवण्यासाठीच्या कायदेशीर आव्हानात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
खाण कामगार, ट्रक ऑपरेटर आणि इतर भागधारकांच्या रोजीरोटीच्या चिंतेबद्दल न्यायालय सहानुभूतीपूर्ण होते. न्यायालयाचा हा निर्णय केवळ कायदेशीर विजय नसून हजारोंच्या उपजीविकेला आधार देणार्या उद्योगाचे, निरंतर कार्य सुनिश्चित करणारा व गोव्याच्या आर्थिक स्थैर्याला महत्त्वपूर्ण चालना देणारा ठरणार आहे. या निर्णयामुळे नियमन केलेल्या खाण क्षेत्राचे महत्त्व बळकट झाले आहे. याचिकाकर्ते अनिल सालेलकर यांनी सार्वजनिक हिताच्या नावाखाली दाखल केलेला हा खटला केवळ निहित स्वार्थासाठी खाण वाहतूक रोखण्याचा प्रयत्न असल्याचे उघड झाले आहे. सेसा मायनिंग कॉर्पोरेशन लि.चे माजी कामगार आणि पिळगावचे रहिवासी असलेले सालेलकर यांनी, यापूर्वी जाहीरपणे त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास खनिज वाहतूक रोखण्यात येईल, असे म्हटले होते.
सालेलकर यांनी, डिचोली खनिज पट्ट्यामधून लोह खनिज वाहतूक रोखण्यात आपली कोणतीही भूमिका नाही असे न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे खोटे विधान केले होते. मात्र, मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत वाहतूक रोखण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असेल, असे सूचित करणारे त्यांचे विधान न्यायालयासमोर ठेवण्यात आली. त्यामुळे त्यांच्याकडे न्यायालयासमोर बिनशर्त माफी मागण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी खोटी आणि चुकीची विधाने केल्याचे मान्य केले. वेदांता सेसा गोवाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, सालेलकर हे जनहित याचिकांच्या आडून वैयक्तिक स्वार्थाचा अजेंडा चालवत आहेत आणि निहित स्वार्थासाठी कंपनीच्या आड येत आहेत.
डिचोली ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष सतीश गावकर म्हणाले, एका दशकाच्या बंदीनंतर खाणकाम पुन्हा सुरू झाले आहे आणि कायदेशीररित्या अनिवार्य असलेल्या, खाण लिलावाचे नियम तसेच इतर नियम व अटींनुसार सुरु झाले आहे. हे खेदजनक आहे, की काही व्यक्ती निहित स्वार्थासाठी कायदेशीर उपायांचा गैरवापर करत आहेत आणि खोट्या गोष्टींचा आधार घेत, या याचिका दाखल करत आहेत.
मुळगावच्या नागरिकांनी येथील वेदांत कंपनीविरोधात खाणीवर दोनदा धडक देऊन खाणकाम बंद केले होते. या संदर्भात उपजिल्हाधिकार्यांसोबत बैठक झाल्यानंतर शुक्रवारी ( दि. 21 रोजी) दुपारी 3 वाजता मुळगाव येथील खाण प्रभावित क्षेत्राची उपजिल्हाधिकारी व इतर संबंधितासह संयुक्तपणे पाहणी करण्यात येणार आहे. खाण उपसंचालक, गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी, मामलेदार, कृषी अधिकारी, वन अधिकारी, यांच्याबरोबर पंचायत मंडळ, मुळगाव कोमुनिदाद अध्यक्ष, देवस्थान समितीचे अध्यक्ष, मुळगाव नागरिक कृती समिती, मुळगाव जैव विविधता समिती आणि वेदांत खाण कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित असतील.