

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी स्मार्ट सिटीची कामे रखडली असल्याने गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने 'इमॅजिन पणजी' पुन्हा धारेवर धरले. कामाला वारंवार विलंब का होतोय'? हे काम वेळेत पूर्ण करावे, हे वारंवार का सांगावे लागते, असाही प्रश्न करत इमॅजिन पणजीला न्यायालयाने खडे बोल सुनावले.
स्मार्ट सिटी मिशन व अमृत १.० अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेस कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत ही कामे पूर्ण केली जात आहेत, अशी माहिती इमॅजिन पणजीच्यावतीने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात आली.
सेंट्रल पणजीमध्ये रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने सुरू असून, ३,४०० मीटर रस्ते पूर्ण झाले आहेत, तर ३,४५० मीटर रस्त्यांचे काम प्रगतिपथावर आहे. २ जानेवारी २०२५ पासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात ७३५ मीटर रस्त्यांची कामे निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण करण्यात आली आहेत.
दुसऱ्या टप्प्यात १,०२४ मीटर रस्त्यांची कामे १८ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान सुरू असून, २८ फेब्रुवारीपर्यंत १,४१५ मीटर आणि ३१ मार्चपर्यंत ५३० मीटर रस्त्यांची कामे पूर्ण होईल, अशी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात आली आहे. सांतिनेज येथील ३ हजार मीटरपैकी २,८०० मीटर रस्ते पूर्ण झाले आहे. उर्वरित २०० मीटर रस्त्याचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण होतील. रुआ द ओरेम भागात १३,८०० मीटर रस्त्यांची कामे बाकी आहेत.
सेंट्रल पणजीमध्ये सांडपाणी वाहिनी जोडण्याची १५ आंतरजोडणीची कामे पूर्ण झाली असून, भाटले, अल्तिन्हो, मळा आणि मिरामार येथे पाईपलाईन टाकण्याची कामे सुरू आहेत. अनेक भागांमध्ये मॅनहोलची उभारणी आणि घरगुती जोडण्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.