

पणजी : गोवा औद्योगिक विकास महामंडळ (जीआयडीसी) ने वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील ‘हॅलो वर्ल्ड’ नावाच्या प्रस्तावित आयटी पार्कसाठी परवानगी योग्य फ्लोअर एरिया रेशो (एफएआर) 150 वरून 300 पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. प्रस्तावित ‘हॅलो वर्ल्ड’ वसाहतीच्या चौथ्या टप्प्याच्या शेवटच्या टोकावर 4 लाख चौ. मी. (98 एकर) मध्ये पसरलेले आहे.
जीआयडीसीने आयटी कंपन्यांसाठी प्रत्येकी 25 हजार चौ. मी.चे सात भूखंड राखून ठेवले आहेत; जे अंदाजे 3 लाख चौ. मी. वर येतील, तर उर्वरित 1 लाख चौ. मी. व्यवसाय हॉटेल, वसतिगृह आणि उपयुक्तता सेवांसाठी राखून ठेवले जातील.
नुकत्याच झालेल्या जीआयडीसीच्या 398 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला. जिथे संचालक मंडळाने व्यवस्थापकीय संचालकांना सर्व आवश्यक पावले उचलण्याचे अधिकार दिले. अधिकार्यांचा असा विश्वास आहे की, वेर्णात मजबूत पायाभूत सुविधा, स्थिर औद्योगिक परिसंस्था आणि अखंड कनेक्टिव्हिटी असल्याने ते आयटी क्षेत्रासाठी नैसर्गिकरीत्या योग्य स्थान आहे.
समितीने मंजूर केलेल्या, लेआउट प्लॅनमध्ये आयटी कंपन्यांसाठी प्रत्येकी 25 हजार चौ. मी.च्या आसपासचे 7 भूखंड आणि कर्मचार्यांच्या निवासस्थानासाठी स्वतंत्र भूखंड उपलब्ध आहेत.
एफएआर 150 वरून 300 पर्यंत दुप्पट करण्याच्या प्रस्तावाला गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम (सुधारणा) नियमावली, 2024 चे समर्थन आहे; जे जीआयडीसीला सरकारी मान्यतासह एफएआर, सेटबॅक, पार्किंग आणि कव्हरेजमध्ये शिथिलता आणण्याची परवानगी देते.
मंजुरीनंतर, एफएआर शिथिलतेमुळे ‘हॅलो वर्ल्ड’मधील विकासाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे; ज्यामुळे ते तंत्रज्ञान कंपन्या आणि संबंधित सेवांसाठी सर्वांत मोठ्या केंद्रांपैकी एक बनण्याची शक्यता आहे.