

- चक्रीय वारे वाहण्याची शक्यता वर्तविल्याने मुरगाव बंदरातील कामकाज ठप्प
- खोबरावाडा-कळंगुट येथे झाड कोसळून पाच वाहनांचा चुराडा
- वेरे येथील पेट्रोलपंप शेजारील झाड संरक्षक भिंतीवर कोसळले, दुचाकींचे नुकसान
- इंदिरानगर-चिंबल येथे तीन माड कोसळून दुचाकी, चारचाकीचे मोठे नुकसान
पणजी : राज्यात गेल्या चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम असून, राज्यातील सर्व भागात वादळी वार्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. नैर्ऋत्य मोसमी वारा आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे पडझडीच्या घटना वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कळंगुटमध्ये आंब्याचे झाड पडून सुमारे 5 ते 6 वाहनांचे सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, गोवा वेधशाळेने शुक्रवारीही मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे आजही राज्यभर मोठ्या पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कर्नाटक-गोवा किनार्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर मध्य-उष्णकटिबंधीय पातळीपर्यंत पसरलेले वरच्या हवेतील चक्राकार वारे त्याच प्रदेशात कायम आहेत. त्याच्या प्रभावाखाली, पुढील 12 तासांत त्याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ते उत्तरेकडे सरकण्याची आणि पुढील 36 तासांत कमी दाबाचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा आहे.
उत्तर कर्नाटक-गोवा किनार्यापासून पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील चक्रवाती अभिसरणापासून आंध्र प्रदेशच्या किनारी प्रदेशापर्यंत एक ट्रफ रेषा पसरलेली असून समुद्रसपाटीपासून सरासरी 3.1 कि.मी. उंचीवर आहे. या हवेतील चक्राकार वार्यांमुळे मान्सून केरळमध्ये 6 दिवस लवकर येण्याची शक्यता निर्माण झाली असून नैऋत्य मान्सून पुढील 3-4 दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहेम्हणजे त्याच्या सामान्य वेळापत्रकापेक्षा जवळजवळ सहा दिवस आधी येईल. नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात पुढे सरकला आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून 25 मे पर्यंत तर राज्यात पुढील तीन-चार दिवसात म्हणजेच या महिनाखेर पर्यंत दाखल होऊ शकतो.