

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हरवले येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानच्या व्यवस्थापन समितीची बहुप्रतिक्षित निवडणूक अखेर २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. डिचोलीचे उपजिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या निवडणूक अधिसूचनेनुसार, २०२५-२०२८ या कालावधीसाठी १,७२८ महाजन मतदानास पात्र ठरविण्यात आले आहेत.
महाजनांच्या पात्रता आणि नोंदणीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही निवडणूक अनेक वर्षांपासून रखडली होती. आता न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असतानाच निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देवस्थानातील महाजनांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी मागे घेता येणार आहे. प्रत्यक्ष मतदान २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुद्रेश्वर देवस्थानच्या परिसर होणार आहे.
मतदानापूर्वी सकाळी ८ ते ९ या वेळेत महाजनांची नोंदणी व ओळख पडताळणी केली जाणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे. डिचोलीचे संयुक्त मामलेदार - २ शैलेश कोठावळे हे निवडणूक प्रक्रियेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
या निवडणुकीवर उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेचा परिणाम होऊ शकतो.
प्रलंबित याचिकेतील निकाल तसेच न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या पुढील निर्देशांच्या अधीन राहूनच ही निवडणूक होणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेली देवस्थान व्यवस्थापन समितीची निवडणूक आता प्रत्यक्ष होणार असल्याने १,७२८ महाजनांच्या मतदानातून नव्या व्यवस्थापन समितीची निवड होणार आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेचा अंतिम परिणाम काय होतो, याकडेही लक्ष राहणार आहे.