साखळी : पुढारी वृत्तसेवा
हरवळे पंचायतीने स्वयंपूर्ण गोवा उपक्रमांतर्गत तसेच कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण गोव्यासमोरा आदर्श निर्माण केला आहे. इतर पंचायतींनीही हरवळे पंचायतीचा आदर्श घेऊन 'नेट झिरो', 'पिंक डस्टबीन' प्रकल्प असे उपक्रम राबवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
२०१२ मध्ये आपण सर्वप्रथम आमदार झाल्यानंतर हरवळे ही स्वतंत्र पंचायत व्हावी, यासाठी ठराव मांडला आणि तो मंजूर झाल्यानंतर हरवळे पंचायतीची स्थापना झाली. हा निर्णय सार्थ ठरवताना पंचायतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमांतर्गत यावेळीही हरवळे पंचायतीला पुरस्कार मिळाला आहे.
सक्रिय पंचायत मंडळ आणि नागरिकांचे सहकार्य यामुळेच ही कामगिरी शक्य झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हरवळे ही गोव्यातील घरांवर सौरऊर्जा प्रकल्प साकारण्यासह सॅनिटरी कचऱ्यासाठी पिंक डस्टबीन उपलब्ध करून देणारी पहिली पंचायत ठरली आहे. यापूर्वीही पंचायतीने कचरा व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, गोव्यातील इतर पंचायत मंडळे हरवळेला भेट देऊन येथील कचरा व्यवस्थापनाची माहिती घेत आहेत.
ही वाटचाल यापुढेही अशीच सुरू ठेवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
हरवळे येथे घरोघरी पिंक कचरा गोळा करणे, सौरऊर्जा पॅनेल प्रकल्पाचे उद्घाटन तसेच इतर सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच गौरवी नाईक, उपसरपंच देमगो मळीक, स्वयंपूर्ण मित्र सतीश वायंगणकर, बीडीओ ओमकार मांजरेकर, लुपिन फाऊंडेशनचे जितेंद्र राणे, पंचसदस्य अजय मळीक,
अस्मिता मळीक, ममता दिवकर, पाळीचे सरपंच प्रसाद सावंत आदी उपस्थित होते.
हरवळे गावात संपूर्ण सौरऊर्जा निर्मितीसाठी हाती घेतलेल्या प्रकल्पालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायतीची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सरपंच गौरवी नाईक यांनी सांगितले. सूत्रसंचालन समृद्धी गणपुले यांनी केले.
हरवळे पंचायतीची नवीन इमारत व्हावी, हे आपले स्वप्न होते. मात्र, जागा उपलब्ध होत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित होता. आता सध्याची पंचायत इमारत असलेल्या सरकारी जागेतच विद्यमान इमारत जमीनदोस्त करून तीन मजली प्रशस्त पंचायत इमारत साकारण्यात येणार आहे. या इमारतीची पायाभरणी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.