

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारने सुरू केलेल्या गोवा उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला गृहिणींचा गृह आधार किंवा दयानंद सामाजिक सुरक्षा योजना (डीडीएसवाय) या योजनांचा लाभ बंद होणार नाही. विरोधी पक्षांनी जी अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे, त्याकडे महिलांनी लक्ष देऊ नये. गोवा सरकारने निवडणुकीत जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने १०० टक्के पूर्ण केली आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी एक व्हीडिओ जारी करून डॉ. सावंत यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार गोवा उज्ज्वला योजनेअंतर्गत गोमंतकीयांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर साठीचे तीन हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत. ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांच्या खात्यावर येत्या दोन दिवसांमध्ये पैसे जमा होतील.
ज्यांनी अर्ज भरले नाहीत त्यांनी ते भरावेत. त्यांनाही पुढील टप्प्यात लगेच लाभ मिळेल. पहिल्या टप्प्यात अडीच लाख कुटुंबांना उज्ज्वला योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.महिलांच्या नावे अर्ज भरा. पंचायतींमध्ये अर्ज उपलब्ध आहेत, त्यासोबतच आमदार व मंत्री यांच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, अर्जाच्या वरील भागात ज्या महिला गृह आधार किंवा डीडीएसवाय योजनेचा लाभ घेतात त्यांच्या नावाने अर्ज भरायचा आहे. गॅस कनेक्शन जरी पतीच्या नावे असले तरी अर्ज वरील दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या नावे भरावा. खालील भाग हा ज्या महिला गृह आधार किंवा डीडीएसवाय योजनेचा लाभ घेत नाहीत त्या महिलांच्या नावे भरावा, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले.
गोवा उज्ज्वला योजनेचे अर्ज राज्यातील झेरॉक्स दुकानांमध्येही उपलब्ध आहेत. त्यामुळे पंचायतीमध्ये गर्दी न करता नागरिक तिथूनही हे अर्ज घेऊन भरून देऊ शकतात किंवा त्या अर्जाचे झेरॉक्सही काढून भरून देता येतात.