

पणजी : राज्यातील कलावंतांची शिखर संस्था असणार्या कला अकादमीच्या अध्यक्षपदी कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे होते. आता त्यांना मंत्रिपदावरून कमी केल्याने त्यांच्याकडे कला अकादमीचे अध्यक्ष पदही जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोण? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. कला राखण मांडच्या वतीनेही आज कला अकदमीचे हित जपणारी व्यक्ती या पदावर असावी, अशी मागणी केली आहे.
राज्यातील कला, संस्कृती, वारसा, संगीत यांना प्रोत्साहन देण्याचे काम कला अकादमीच्या मार्फत केले जाते. राज्यातील कलावंतांनाही याच संस्थेमार्फत विविध माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात कला अकादमीचे विशेष स्थान आहे. राज्यात सध्या माजी मंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्यानंतर ते अध्यक्ष असलेल्या कला अकादमीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडून जाईल, अशी शक्यता आहे. त्यांच्या जागी कोण येणार ? साहजिकच याविषयी चर्चा सुरू झाली आहे. विविध संस्थांकडून यासाठी आता मागणी आणि विनंती सुरू झाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून कला अकादमी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कला अकादमीचे नूतनीकरण, त्यासाठी काढलेल्या नियमबाह्य निविदा, कला अकादमीचा बाह्य मंच कोसळणे, या नूतनीकरणांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोपही अनेक दिवसांपासून राज्यातील कलाकार करत आहेत. हा विषय विधानसभा पटलावर खूप गाजला. आता गावडे यांच्यावर कारवाई झाल्याने अध्यक्षपद कला अकादमीचे आणि कलावंतांचे हित जपणार्या व्यक्तीकडे दिले जावे, अशी मागणी होत आहे.
पूर्वी कला अकादमी अध्यक्षपद आणि कला आणि संस्कृती खात्याचे मंत्रिपद वेगळे होते. स्वर्गीय मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे अध्यक्ष होते. आमदार विष्णू सूर्या वाघ मंत्री नसताना कला अकादमीचे अध्यक्ष होते. त्यामुळे मंत्रिपद आणि अध्यक्षपद वेगवेगळ्या व्यक्तींनी भूषवले आहे. आता मात्र हे पद कोणाला मिळणार याविषयी जोरदार उत्सुकता लागली आहे.