

फोंडा : नाट्यमय घडामोडीनंतर बेतकी-खांडोळा पंचायतीवर प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे यांनी वर्चस्व मिळवले आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्याच गटाचे सरपंच आणि उपसरपंच निवडून आणले. सोमवारी बेतकी-खांडोळा पंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात अविश्वास ठराव संमत झालेल्या विशांत नाईक यांची सरपंचपदी तर संजीवनी तळेकर यांची पुन्हा एकदा उपसरपंचपदी निवड झाली.
या पंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचावर अविश्वास ठराव आणण्यासाठी मोठी भूमिका बजावलेले पंचायत सदस्य दिलीप नाईक यांनी सरपंच पदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पुन्हा एकदा विशांत नाईक व संजीवनी तळेकर यांचा सरपंच आणि उपसरपंचपदासाठीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, हा सत्याचा विजय असल्याचे आमदार गोविंद गावडे यांनी म्हटले आहे. ऐनवेळी एका पंचायत सदस्याने घुमजाव केल्यामुळे निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्याचे सरपंच पदाचे दावेदार दिलीप नाईक यांनी म्हटले आहे.
प्रियोळ मतदारसंघातील बेतकी-खांडोळा सरपंच, उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. कारण गोविंद गावडे यांचे मंत्रिपद मुख्यमंत्र्यांनी काढून घेतल्यानंतर बेतकी-खांडोळा पंचायतीच्या गावडे समर्थक सरपंच व उपसरपंचांवर लगेच अविश्वास ठराव दाखल झाला होता. 9 पंचसदस्यीय मंडळातील 5 जणांनी हा ठराव दाखल केला होता. मात्र पाचपैकी एका महिला पंचायत सदस्याने घुमजाव केल्यामुळे अखेर गोविंद गावडे यांचे वर्चस्व सिद्ध झाले.