

पणजी : राज्यात 2027 पर्यंत 21 हजार 200 रूफटॉप सौर प्रणालींची स्थापना आणि 65 मेगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात ‘पंतप्रधान सूर्य घर : मुफ्त वीज योजनेचा’ उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, ही योजना गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी व शाश्वत वीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यात 4,700 हून अधिक गृहीताधारित मान्यतांना मंजुरी देण्यात आले असून 7.34 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जात आहे. यासाठी 4.28 कोटींच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. यासाठी 25 वर्षांच्या देखभाल हमीसह कंत्राटदारांची लवकरात लवकर नेमणूक केली जाणार आहे. हॉटेल्स, सरकारी कार्यालये व निवासी संकुलांमध्ये रूफटॉप सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढवणे हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
गोवा विनामूल्य वीज योजना टप्प्याटप्प्याने समाप्त करून या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. नवीन बांधकाम परवान्यांमध्ये सौर उर्जेची सक्ती करणे यासाठीही यावेळी चर्चा झाली. ही योजना शाश्वत ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण व ‘नेट झिरो’ कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने सरकारच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.