

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील पहिले हाय-टेक वर्कस्पेस पॉड स्टेशन कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात येणार असल्याची माहिती माहिती-तंत्रज्ञान व पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. या कार्यक्षेत्रात वीज, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि सहकार्याने काम करण्याच्या (को-वर्किंग) सुविधांनी सुसज्ज छोटे मॉड्युलर क्युबिकल्स असतील, असेही मंत्री खंवटे म्हणाले.
हे पॉड स्टेशन डिजिटल नोमॅड्स, दूरस्थ पद्धतीने काम करणारे स्टार्टअप्स आणि गोव्याला आपले घर बनवलेल्या तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या गरजा पूर्ण करेल. कोविडनंतर गोव्यात मोठ्या संख्येने डिजिटल नोमॅड्स आणि सर्जनशील प्रतिभावंत एकत्र येत आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळ मनोरंजनात्मक उपक्रमांसोबत काम करण्याची संधी देणारी ही संकल्पना यावर्षी मेमध्ये बागा बीचवर आयोजित 'गोवा शॅकथॉन २०२६'मधून घेण्यात आली आहे.
या उपक्रमात समुद्रकिनाऱ्यावरील झोपड्यांचे कामाच्या ठिकाणी रूपांतर करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे खंवटे यांनी एका कार्यक्रमात सांगितले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संबोधित करताना खंवटे म्हणाले की, सध्या तयार होत असलेले गोवा एआय धोरण २०३० पर्यंत ५० हजार तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सज्ज करेल.
या धोरणातून पायाभूत सुविधा प्रयोगशाळा आणि उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यास प्रोत्साहन मिळेल. गोव्यात उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून मान्यताप्राप्त ८४६ स्टार्टअप्स असून, त्यापैकी सुमारे ४०० स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखालील आहेत, असेही मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
२२ रोजी 'गोवा एआय टेक कॉन्क्लेव्ह २०२६' आयोजित करण्यात येणार आहे. एआय मिशन असलेले गोवा हे भारतातील पहिले राज्य असून ही गोष्ट गोमंतकीयांसाठी अभिमानाची असल्याचेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.
महाविद्यालयीन तरुणांमध्ये उद्योजकतेची क्षमता...:
महाविद्यालयीन तरुणांमध्ये स्थानिक उद्योजकतेची मोठी क्षमता असून, गोवा स्टार्टअप धोरण युवा प्रतिमेला महत्त्व देते. विद्यार्थ्यांनी दैनंदिन समस्या ओळखून त्यावर उपाय विकसित करावेत, उपलब्ध संसाधनांचा वापर करावा आणि लवचिकता निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन खंवटे यांनी केले.