

मडगाव : पाकिस्तानची राजधानी कराची येथे जन्मलेल्या लुसियाना फर्नांडिस या महिलेने आपल्या कुटुंबासोबत कराचीच्या सद्दार येथे पहिले गोमंतकीय खाद्यपदार्थांचे दुकान सुरू केले आहे. आजही त्यांची नाळ गोव्याच्या मातीशी जोडलेली आहे, याचे हे उदाहरणच आहे. सद्दर येथे 24 ऑक्टोबर 2019 रोजी ‘आमचे गोवा’ हे खाद्यपदार्थांचे दुकान त्यांनी सुरू केले.
फाळणीवेळी बर्याच भारतीयांनी पाकिस्तानाचा पर्याय निवडला होता. पाकिस्तानात आजही त्यांच्या वस्त्या अस्तित्वात असून त्यात गोमंतकीय कुटुंबांचाही समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताणल्या गेलेल्या संबंधांचा त्रास त्यांना होत असला, तरीही पाकिस्तानात स्थायिक झालेले गोमंतकीय आजही आपल्या मातीशी जोडले गेले आहेत, याचे हे पुरेपूर उदाहरण आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत केवळ चारच वेळा फर्नांडिस यांच्या कुटुंबाने गोव्यास भेट दिली आहे. 1999 मध्ये हे पहिल्यांदा आपल्या कुटुंबासह गोव्यात येऊन गेले होते. गोव्यात भेट द्यावीशी वाटते पण व्हिसा मिळण्यावर निर्बंध आल्यामुळे ते शक्य होईल, असे वाटत नाही, अशी खंत फर्नांडिस यांनी व्यक्त केली आहे. जशी आम्ही कल्पना केली होती त्यापेक्षा गोवा फार वेगळा आहे. रस्त्यावर वाहनेच वाहने आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी गोव्याबद्दल दिली.
पाकिस्तानात गोव्याच्या नावाने दुकान सुरू करणार्या लुसियाना फर्नांडिस यांच्या हिंमतीस दाद द्यावी लागेल. मुस्लिम राष्ट्र असलेल्या पाकिस्तानाबरोबर भारताचे संबंध ताणलेले असले तरीही फाळणीपूर्वी पाकिस्तानात स्थायिक झालेल्या गोमंतकीयांच्या मनात आजही गोव्याविषयी तेवढाच आदर आणि प्रेम आहे. लुसियाना त्यांच्या पतीचे, आजोबा व कुटुंब फाळणीच्या 30 वर्षांपूर्वीच कराचीत दाखल झाले होते. लुसियाना व त्यांच्या पतीचा जन्म कराचीत झाला आहे. त्यांची तिन्ही मुलेही कराचीत जन्मलेली आहेत. आतापर्यंत केवळ चारवेळा त्यांनी गोवा पाहिला आहे. गोव्यात त्यांचे नातलग नेमक्या कुठल्या भागात राहतात हे त्यांनाही माहिती नाही. तरीही गोव्याची ख्रिश्चन धर्मियांची भाषा आणि पारंपरिक खाद्यपदार्थांविषयी त्यांना पुरेपूर जाण आहे.
रोजगार आणि व्यवसायानिमित्त असंख्य गोमंतकीयांनी आखाताचा मार्ग धरला होता. अरब राष्ट्रांसह युके, लंडन आणि अमेरिकेतही गोमंतकीय आहेत. आखाती देशात रोजगार उपलब्ध आहेत. पण गोमंतकीय आणि पारंपरिक खाद्यपदार्थांची चव तिथे मिळणे शक्य नाही. ‘आमचे गोवा’ स्टोअरमध्ये बनवले जाणारे गोव्याचे पारंपरिक आणि घरगुती जिन्नस कराचीत फार प्रसिद्ध आहेत. पाकिस्तानात स्थायिक झालेले कित्येक गोमंतकीय वर्षानुवर्षांपासून गोव्यात येऊ शकलेले नाहीत. साठ वर्षानंतरचा विकसित गोवा पाहण्याचे भाग्य त्यांना लाभलेले नाही. पाकिस्तानी गोमंतकियांवर पाकिस्तानाच्या नागरिकत्वाचा शिक्का आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याची हे लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
पाकिस्तानात पारसी, इराणी, अशा विविध समुदायातील पारंपरिक खाद्यपदार्थ विक्री दुकाने आहेत. मात्र गोमंतकीय खाद्यपदार्थांची चव देणारे फार वर्षांपूर्वी बंद पडलेली लॉरेन्स बेकरी वगळता गेल्या बर्याच वर्षांपासून पाकिस्तानात एकही गोमंतकीय जिन्नस मिळणारे दुकान उघडले गेले नव्हते. जेसी मिस्किता ही कराचीतील गोमंतकीयांकडून 1858 मध्ये सुरू केलेली बेकरी सध्या मुसलमान व्यावसायिकांकडून चालवली जात आहे. इथे स्थायिक झालेल्या गोमंतकीयांना सणासुदीच्या काळात गोव्यातून जिन्नसांचा पुरवठा केला जात होता. बर्याचदा हे खाद्यपदार्थ पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच खराब होत होते. येथील गोमंतकीयांना ताजे आणि गोव्याच्या परंपरेशी जोडणारे जिन्नस सहज उपलब्ध व्हावेत या उद्देशाने गोवा स्टोअर उघडण्यात आल्याची माहिती फर्नांडिस यांनी दिली.
कराचीतील सद्दर, कियामारी, डिसिल्वा टाऊन, कॅथोलिक कॉलनी, या भागात गोमंतकीयांच्या वसाहती आहेत. सुरुवातीला पाकिस्तानातील गोमंतकीयांच्या लोकसंख्येचा आकडा जवळपास एक लाख एवढा होता. मात्र ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, रोजगाराचा अभाव, पोशाखापासून ते राहणीमान आणि भाषेवरील निर्बंध तसेच कश्मीरच्या विषयावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताणलेल्या संबंधांमुळे पाकिस्तानी ख्रिश्चन गोमंतकीयांनी कॅनडा, पोर्तुगाल आणि लंडनमध्ये स्थलांतरित होणे पसंत केले. केवळ कराचीतील गोमंतकियांची संख्या आता केवळ दोन हजारांवर आली आहे. बरीच कुटुंबे जी फाळणीपूर्वी पाकिस्तानात दाखल झाली होती त्यांनी अद्याप पाकिस्तान सोडलेला नाही.
ख्रिस्ती धर्मीयांत प्रसिद्ध असलेले सोर्पोतेल, धोदेेल, आंब्याचे लोणचे, मासळीचे हुमण (फिश करी), पारंपरिक भाजी, प्राऊन्स बालच्याव, चिली पिकल, ख्रिसमसचे केक या सारख्या पारंपरिक आणि घरगुती पद्धतीने बनवल्या गेलेल्या गोवन जिन्नसांची ऑनलाईन पद्धतीने कराचीत विक्री केली जाते. त्याशिवाय कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांतही स्थायिक गोमंतकियांना हे जिन्नस पाठवले जातात, अशी माहिती फर्नांडिस यांनी दिली.