

गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.
दुपारी १२ वाजेपर्यंत भाजप-मगो युतीने ८ जागा जिंकल्या आहेत.
काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीला ४ जागा, आरजीला १ जागा मिळाली आहे.
संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल अपेक्षित आहेत.
पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठीची मतमोजणी आज, सोमवारी सुरू झाली आहे. दुपारी बारापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्ष आणि मगो युतीने ८ जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षांच्या युतीने ४ जागांवर विजय मिळवला आहे.
आरजी या स्थानिक पक्षाचा एक उमेदवार तसेच इतर एक उमेदवार असा आतापर्यंतचा निकाल आहे. मतपत्रिकेद्वारे गोव्यातील दोन जिल्हा पंचायतींसाठी २० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. उत्तर गोव्यात २५ जागा आणि दक्षिण गोव्यात २५ जागा अशा दोन जिल्हा पंचायती गोव्यात आहेत.
२०२० च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने दोन्ही जिल्हा पंचायतींवर वर्चस्व मिळवत सत्ता स्थापन केली होती. यावेळी पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप सिद्ध झालेला दिसून येत आहे, मात्र विरोधकांकडून भाजपला काही जागांवर कडवी लढत दिली जात आहे. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सर्व ५० जागांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.