

पणजी : पुढारी वृत्तसेवा
विधानसभेच्या पाच दिवसीय हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी समारोप झाला. हिवाळी अधिवेशनाचा विचार करता सरकारने विनियोग विधेयकासह अनेक विधेयके मांडून ती संमत केली. या अधिवेशनात सरकारला घेरण्याची परिपूर्ण तयारी विरोधी पक्षांच्या आमदारांनी केली होती.
मात्र, सरकारनेही विरोधी पक्षांच्या आमदारांना तोडीस तोड उत्तर दिले. दरम्यान, या अधिवेशनात बर्च नाईटक्लब अग्निकांड, चिंबल येथील युनिटी मॉल हे विषय प्रचंड गाजली. या अधिवेशनांचा प्रारंभ १२ जानेवारीला राज्यपालांच्या अभिभाषणाने झाला होता.
या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक ठरावावर तीन दिवस चर्चा करून तो संमत करण्यात आला. तसेच वंदे मातरम् या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त खास चर्चा करण्यात आली. अधिवेशनात गोवा जमीन महसूल अधिनियम, गोवा मुंडकार यांच्यासह अनेक विधेयकांना मुज़री देण्यात आली.
विधानसभेत वर्ष २०२५-२६ च्या अनुदानित पुरवणी मागण्यांना (दुसरा गट) मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. तसेच, गोवा विनियोग विधेयक २०२६ संमत करण्यात आले. या पाच दिवसीय अधिवेशनात बर्च नाईटक्लब अग्निकांडांचा मुद्दा चांगलाच गाजला. चिंबल येथील युनिटी मॉल व तेथील नागरिकांचे आंदोलन, मुरगावातील कोळसा हाताळणी आदी विषयावर विरोधी आमदारांनी सभागृहात आवाज उठवत राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
नगरपालिका दुरुस्ती विधेयकाला मंजुरी
अनुदानित मागण्या २०२५-२०२६ वर्षांच्या खर्चाला मान्यता देणाऱ्या गोवा विनियोग विधेयक २०२६ विधानसभा सभागृहात संमत करून हिवाळी विधानसभा अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्राधिकरण दुरुस्ती विधेयक, गोवा कोळसा व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक, गोवा जनविश्वास दुरुस्ती विधेयक, पणजी महापालिका दुरुस्ती विधेयक, गोवा नगरपालिका दुरुस्ती विधेयक आदी विधेयके संमत झाली.