

पणजी : हवामान खात्याने राज्यात रविवारी उष्णतेसह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी सायंकाळी सुद्धा राजधानी पणजीतील तापमान ३१ अंश सेल्सिअस होते.
राजधानी पणजीत सर्वाधिक उष्णता जाणवली. कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सिअस होते. तरीही प्रत्यक्ष जाणवणारे तापमान तब्बल ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे सगळेजण उकाड्याने हैराण झाले होते. दुपारी बाहेर पडायचे म्हणजे उष्माघाताची भीती, शिवाय संपूर्ण शरीर घामाने भिजणार एवढे नक्की!
भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, आर्द्रतेचा विचार करता प्रत्यक्ष जाणवणारे तापमान या हंगामात आतापर्यंत ४३ अंश सेल्सिअसच्या वर गेले नव्हते. तथापि, हवामान खात्याने २३ एप्रिलसाठी संपूर्ण गोव्यात उष्णता आणि आर्द्रतेचा इशारा देणारा येलो अलर्ट जारी केला होता. त्यानंतर पुन्हा २६ तारखेपर्यंत उष्णतेसह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.