

पणजी : ‘विकसित भारत 2047’चे स्वप्न साकार करण्यासाठी अध्यात्म, राष्ट्रसेवा आणि विकास या तिन्ही गोष्टींचा समन्वय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यटनाचा प्रमुख भाग असलेल्या गोवा राज्याची आणि आध्यात्मिक कार्य करणार्या पर्तगाळी मठाची ‘विकसित भारत 2047’च्या ध्येयात महत्त्वाची भूमिका राहील. गोव्यावर माझे खूप प्रेम आहे. कारण, गोवा माझ्यासाठी टर्निंग पॉईंट असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्तीनिमित्त श्रीरामाच्या 77 फूट भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात बोलताना पंतप्रधानांनी अध्यात्म, इतिहास, संस्कृती आणि विकास यावर आपले मत व्यक्त केले.
ते म्हणाले, आध्यात्मिक कार्य करतानाच पर्तगाळ मठाने संस्कृतीचे संवर्धन केले. बदलत्या परिस्थितीत सेवा कार्य चालू ठेवताना मठाने आपली दिशा बदलली नाही, उलट लोकांना योग्य दिशा देण्याचे कार्य केले. समाजाला आणि राष्ट्राला योग्य दिशा देण्यासाठी अध्यात्म, इतिहास आणि संस्कृतीची आवश्यकता असते. भक्ती आणि शिस्तीमुळे एक सामूहिक ऊर्जा तयार होत असते. लोकांची मने जोडताना परंपरा आणि आधुनिकता यामधील पर्तगाळ मठ हा एक महत्त्वाचा दुवा राहिलेला आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरणासह पाण्याचे संवर्धन करायला हवे. तसेच, सेंद्रिय शेतीसोबत सशक्त अशी जीवनशैली आत्मसात करायला हवी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. या सोहळ्याला राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, विद्याधीश तीर्थ स्वामी व इतर मान्यवर उपस्थित होते.