

पणजी : गोवा विद्यापीठातील पेपरफुटीप्रकरणी तथ्य शोधन समितीने सादर केलेला अहवाल अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यात संबंधित प्राध्यापक दोषी आढळले आहेत. या प्रकरणी नेमलेल्या तथ्य शोध समितीचा अंतिम अहवाल मिळाला आहे. तो शिक्षण सचिवांनाही पाठवण्यात आला आहे. संबंधितांवर लवकरच कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. एम. खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखाली निवृत्त पोलिस उपमहानिरीक्षक बॉस्को जॉर्ज, माजी प्रा. किरण बुडकुले, माजी निबंधक राधिका नायक आणि व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेजचे प्रा. एम. आर. के. प्रसाद यांचा समावेश असलेल्या तथ्य शोधन समितीने दिलेल्या अहवालानुसार, विद्यापीठात झालेल्या पेपरचोरी प्रकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे. सहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक यांनी भौतिकशास्त्र व उपयोजित विज्ञान विभागात अवैधरित्या घुसून प्रश्नपत्रिकांची चोरी करून ते विद्यार्थिनीला पुरवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि एकंदरीत कुलगुरूंच्या कामकाजावर चांगलेच ताशेरे ओढण्यात येत आहेत.
प्रणव नाईक हे संबंधीत विद्यार्थिनीला परीक्षेदरम्यान, वेळोवेळी चुकीच्या मार्गाने मदत करत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. नाईक हे विद्यापीठाच्या वेळेनंतर केबिनमध्ये प्रवेश करत असल्याचे प्राध्यापकांना माहीत असूनही त्यांनी याबाबत कारवाईची मागणी केली नाही. या सर्व बाबी समितीने अधोरेखीत केल्या आहेत. या प्रकरणी विद्यापीठ व्यवस्थापन आणि प्राध्यापकांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याचा ठपकाही समितीने ठेवला आहे.
तथ्य शोधन समितीच्या अहवालानुसार, प्राध्यापक प्रणव नाईक यांनी सहकारी प्राध्यापकांच्या केबिनची बनावट चावी करून विविध खोटी कारणे सांगून केबिनमध्ये प्रवेश केला होता. केबिनमध्ये ठेवलेले पेपर चोरून ते संबंधित विद्यार्थिनीला दिल्याचे काही सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थांनी कबूल केले आहे.
विद्यापीठात सुरू असलेल्या प्रकाराबाबत प्राध्यापकांनी त्यांच्या विभागप्रमुखांना कल्पना दिल्यानंतरही या प्रकरणी कोणतीच कारवाई झाली नाही. विद्यापीठाची इभ्रत राखण्यासाठी आणि हे प्रकरण दडपण्यासाठी कुलगुरू आणि विभाग प्रमुखांनी या प्रकरणी तपास करणे टाळून एकप्रकारे या घटनेला चालनाच दिल्याचे अहवालात म्हटले आहे. विद्यापीठाने केलेल्या या शिस्तभंगाकडे तथ्य शोध समितीने लक्ष वेधले असून एकंदरीत व्यवस्थापन सुधारण्याची आणि शिस्तपालन करण्याची कठोर शब्दांत सूचना केली आहे.