

पणजी : चोडण - खैराटवाडा येथील एका घराला शनिवारी पहाटे भीषण आग लागून एका महिलेचा मृत्यू झाला. तर धुरामुळे गुदमरून त्यांची दोन मुले बेशुद्ध पडली. त्या दोघांवर बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली आहे.
घरातील इन्व्हर्टरच्या शॉट सर्किटमुळे घराला आग लागल्याचे सांगण्यात येते. या दुर्घटनेत बळी पडलेल्या मृत महिलेचे नाव सपना दयानंद वळवईकर (वय ४९) असे आहे. पहाटेच्या सुमारास वळवईकर यांच्या स्लॅबच्या घरातील हॉलमध्ये अचानक आग लागली. त्यावेळी घरातील सर्वजण झोपेत होते. आग लागल्याचे लक्षात येताच सपना वळवईकर यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीच्या ज्वाळांनी त्यांना वेढल्याने त्या गंभीर भाजल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी समृद्धी (२०) व मुलगा साईतेज (१७) धुरामुळे बेशुद्ध पडले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले व दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले.