

बांदा : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात वाहतूक नियंत्रण अधिक पारदर्शक व शिस्तबद्ध करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे वाहतूक नियमभंग प्रकरणी चलन देण्याचा अधिकार केवळ पोलिस निरीक्षक (Inspector) व उपनिरीक्षक (Sub-Inspector) यांनाच राहणार असून, या अधिकाऱ्यांना बॉडी कॅमेरे वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
असा निर्णय अंमलात आणणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. राज्यात वाहतूक कारवाईदरम्यान होणारे वाद, गैरसमज व तक्रारी कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
चलन देताना संपूर्ण प्रक्रिया बॉडी कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणाखाली होणार असल्याने कारवाईत पारदर्शकता येणार आहे. इतर कोणत्याही दर्जाच्या पोलिस कर्मचाऱ्यांना थेट चलन देण्याचा अधिकार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासोबतच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होणार आहे. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेलाही यामुळे बळ मिळणार आहे.
राज्य सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे गोव्यातील वाहतूक व्यवस्थेत एक नवा अध्याय सुरू होणार असून, इतर राज्यांसाठीही हा निर्णय आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.