

पणजी : राज्यात जबाबदार पर्यटनाचा विस्तार करून दर्जात्मक पर्यटकांनी सर्वांगसुंदर गोव्याची भटकंती करावी यासाठी पर्यटन खात्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आध्यात्मिक, वेलनेस, योगा तसेच इको व आंतरग्राम पर्यटनाला चालना देणारे नवनवे उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती आज पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गोवा विधानसभेत दिली.
त्याचवेळी बेकायदा, आक्षेपार्ह, अनैतिक किंवा सार्वजनिक सुव्यवस्था तथा सामाजिक सलोखा किंवा राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांवर आघात करणाऱ्या पर्यटन कार्यक्रमांवर सरकारने शून्य सहिष्णुतेचे धोरण अवलंबिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कामसूत्र ख्रिसमस नावाखाली एका कार्यक्रमाची माहिती पर्यटन विभागाच्या निदर्शनास आल्यावर, त्याची तत्काळ चौकशी करण्यात आली. त्या कार्यक्रमासाठी खात्याने कोणतीही परवानगी दिली नव्हती, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.
प्रथमदर्शनी, हा कार्यक्रम आध्यात्मिक मेळाव्याच्या नावाखाली आक्षेपार्ह आणि अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणारा असल्याचे दिसून आले. सार्वजनिक उपद्रव आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारा कार्यक्रम असल्याने, या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल केल्याची माहिती मंत्री खंवटे यांनी दिली.