Goa Tourism | दीपावलीच्या सुट्टीत गोवा पर्यटकांनी फुलला

Goa Tourism | हॉटेल्स, रिसॉर्टस् हाऊसफुल्ल; समुद्रकिनारे, चर्च, कॅसिनोंसह पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी
Goa Tourism Season
Goa Tourism Season
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

दीपावलीची सुट्टी सुरू होताच गोवा पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजला आहे. देशभरातील शाळा-महाविद्यालयांना सुटी लागल्याने देशांतर्गत पर्यटकांनी मोठ्या संख्येने गोव्याकडे मोर्चा वळवला आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, चेन्नईसह देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक कुटुंबीय आणि मित्रांसह गोव्यात दाखल होत आहेत. रेल्वे, विमान आणि रस्ते मार्गाने येणाऱ्या पर्यटकांमुळे प्रमुख पर्यटनस्थळे गजबजली आहेत.

Goa Tourism Season
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

दीपावली हा गोव्यातील पर्यटनाचा मोठा हंगाम मानला जातो. यंदाही हॉटेल्स, रिसॉर्टस, गेस्ट हाऊस आणि होम स्टे जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अनेक ठिकाणी आधीच बुकिंग पूर्ण झाले आहे. टॅक्सी, रेंट अ बाईक आणि रेंट अ कार यांनाही मोठी मागणी आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गोव्याचे समुद्रकिनारे, फिश करी राईस, कॅसिनो, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक चर्च पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. सकाळी समुद्रकिनाऱ्यावर सूर्योदय पाहणे, दुपारी वॉटर स्पोर्टस् यांचा आनंद घेणे आणि संध्याकाळी किनाऱ्यावर फेरफटका मारणे, असा पर्यटकांचा दिनक्रम सुरू आहे.

फिश करी-राईस, विविध प्रकारच्या फिश थाळी, प्रॉन्स आणि स्थानिक सीफूडचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल्स व रॉक्समध्ये गर्दी होत आहे. तरुण पर्यटकांमध्ये कॅसिनो, नाईट लाईफ, म्युझिक आणि पार्टीचे आकर्षण असून, रात्री उशिरापर्यंत मांडवी नदीवरील कॅसिनो बोटींवर गर्दी दिसत आहे.

दोना पावला आणि मिरामार बीचवर सकाळपासूनच पर्यटकांची रीघ लागली आहे. त्यासोबतच कळंगुट, बागा, कांदोळी, पाळोळे, कोलवासह राज्यातील किनाऱ्यांवर आलेले पर्यकट समुद्रात डुंबण्याबरोबरच बोटिंग आणि वॉटर स्पोर्टस् यांचा आनंद घेत आहेत. पणजीतील पर्यटनस्थळांवरही पर्यटकांची गर्दी आहे.

सायन्स सेंटरमध्ये विज्ञानाचे प्रयोग, तारांगण आणि विविध प्रदर्शने पाहण्यासाठी लहान मुलांसह कुटुंबे येत आहेत. पणजीतील मुख्य चर्च आणि जुने गोवे येथील चर्चना देश-विदेशातील पर्यटक भेट देत आहेत. पोर्तुगीजकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या चर्चसमोर छायाचित्रे काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे हातगाडे चालक, फळविक्रेते, नारळपाणी विक्रेते, स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेते, टॅक्सी चालक आणि गाईड यांना चांगला व्यवसाय मिळत आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे गोव्याच्या पर्यटनाला पुन्हा सुगीचे दिवस आल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

योग सेतू नवे आकर्षण...

मांडवी नदीवरील योग सेतू हेही पर्यटकांचे नवे आकर्षण ठरले आहे. येथून दिसणारा मांडवी नदीचा आणि पणजी शहराचा नजारा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. भगवान परशुराम पुतळा पाहण्यासाठीही अनेकजण येत आहेत.

महावीर गार्डनमध्ये सकाळ-संध्याकाळ पर्यटक आणि स्थानिकांची गर्दी दिसते. लहान मुलांसाठी खेळणी, हिरवळ आणि शांत वातावरण यामुळे हे उद्यान कुटुंबांचे आवडते ठिकाण बनले आहे.

Goa Tourism Season
Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था...

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि पर्यटन विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. समुद्रकिनाऱ्यांवर लाईफगार्डस् तैनात करण्यात आले असून, समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पणजीत वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. दीपावलीच्या सुट्टीमुळे गोव्याच्या पर्यटनाला पुन्हा झळाळी मिळाली असून, समुद्रकिनारे, संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेत पर्यटक गोव्याच्या आठवणी घेऊन परतत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.