

पणजी : देशासह गोव्यातही अद्याप व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सुरळीत झालेला नसल्याने पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक रेस्टॉरंट्स बंद असून, जी सुरू आहेत त्यांनी दरवाढ केल्यामुळे पर्यटकांच्या खिशाला कात्री लागत आहे. परिणामी देशी पर्यटकांची संख्या कमी झाली असून, अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर विदेशी पर्यटकांनी भारतासह इतर देशांचे दौरे स्थगित केल्याने राज्यातील पर्यटनस्थळांवरील गर्दीही घटली आहे. जुने गोवे येथे पूर्वी दिवसभर पर्यटकांची मोठी गर्दी दिसत होती; मात्र सध्या तेथेही पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
गोव्यात यापूर्वी आलेले अनेक पर्यटक आपली आवडती रेस्टॉरंट्स बंद असल्याने पर्यायी चांगले रेस्टॉरंट शोधताना दिसत आहेत, त्यामुळे त्यांचा बराच वेळही वाया जात आहे. सरकारकडून ४० टक्के व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले जात असले तरी, एक सिलिंडर संपल्यानंतर दुसरा मिळेलच याची खात्री नसल्याने अनेक रेस्टॉरंट चालकांनी आपली आस्थापने बंद ठेवून नूतनीकरणास सुरुवात केली आहे. तर जी रेस्टॉरंट्स सुरू आहेत त्यांनी खाद्यपदार्थांच्या दरात वाढ केली आहे. काही ठिकाणी सिलिंडर उपलब्ध नसल्याचे कारण देत चुलीवर स्वयंपाक केल्याचा दावा करून जादा दर आकारले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
'मी गेली अनेक वर्षे कुटुंबासह गोव्यात येतो. पणजीत आल्यानंतर आम्ही नेहमीच आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवतो. मात्र, ते रेस्टॉरंट बंद असल्याने दुसऱ्या ठिकाणी जेवलो; परंतु त्या पदार्थांना पूर्वीची चव नव्हती. त्यातच जादा पैसे आकारले गेले,' अशी प्रतिक्रिया दिल्लीतील एका पर्यटकाने पणजी येथे व्यक्त केली.