Access Equality Index 2026
पणजी : ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेल्या ‘अॅक्सेस (इन) इक्वॅलिटी इंडेक्स २०२६’मध्ये गोव्याने देशातील २८ राज्यांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ०.६८ गुणांसह गोव्याने ही कामगिरी नोंदवली असून पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा या दोन्ही क्षेत्रांत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर शिक्षण क्षेत्रात गोव्याने दुसरे स्थान प्राप्त केले आहे.
या निर्देशांकातून गोवा राज्याने नागरिकांना मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा पुरविण्यात केलेली प्रगती अधोरेखित झाली आहे. विशेषतः घराघरांत नळाद्वारे पाणीपुरवठा, गृहनिर्माण, आरोग्य सुविधा आणि शाळांमध्ये इंटरनेटची उपलब्धता या बाबींमध्ये राज्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर करत आनंद व्यक्त केला. इक्वॅलिटी इंडेक्स २०२६ मध्ये गोव्याने मिळवलेले अव्वल स्थान ही राज्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा पुरविण्यात गोव्याने देशात आघाडी घेतली असून शिक्षण क्षेत्रातील दुसरे स्थानही महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
या निर्देशांकानुसार, गोव्यातील ९१.९ टक्के घरांना पाईपद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध आहे. तसेच राज्यातील ९३.८ टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्याने केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब या आकडेवारीतून दिसून येते. पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रांतील गोव्याची कामगिरी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक मानली जात आहे.