

पणजी : मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी उतरताना दोन मिनिटे उशीर झाल्यास अव्वाच्या सव्वा शुल्क आकारण्यास सुरुवात केल्याबद्दल आक्रमक झालेल्या टॅक्सी चालकांनी पणजी येथे मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्यावर धाव घेतली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना दिलासा देत यापुढे असा प्रकार होणार नाही, पूर्वीप्रमाणेच सारे घडेल, असे आश्वासन दिले.
मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यवस्थापन पाहणाऱ्या जीएमआर कंपनीच्या नवीन नियमांमुळे राज्यातील पर्यटक टॅक्सी चालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. प्रवासी घेणे व उतरवणे यावेळी गाडी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास थेट 210 रुपये शुल्क आकारले जात असून, या हुकूमशाही निर्णयाचा निषेध करण्यासाठी बुधवारी शेकडो टॅक्सी चालक रस्त्यावर उतरले व त्यांनी मोप येथे आंदोलन केले.