

पणजी : गोवा पोलिस खात्यात पोलिस उपनिरीक्षक पदासाठी गोवा कर्मचारी भरती आयोग (एसएससी) ने नोकर भरती जाहीर केली होती. पोलिस उपनिरीक्षकांच्या 187 पदांसाठी 5,200 अर्ज आले आहेत. त्यापैकी बहुतेक अर्जदार पदवीधर आहेत.
राज्य सरकारकडून पीएसआय भरतीसाठी घेण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या भरती मोहिमेत 157 पुरुष, तर 30 जागा महिलांसाठी आहेत. सध्या राज्यात एकूण पीएसआयची संख्या 369 असून त्यात 69 महिलांचा समावेश आहे.
‘एसएससी’ने म्हटले आहे की, तांत्रिक त्रुटीमुळे, 2 मे ते 5 मे दरम्यान गुणवत्तापूर्ण खेळाडू श्रेणी अंतर्गत पीएसआय पदासाठी अर्ज करणार्या 598 उमेदवारांचा डेटा मिळवता आला नाही. आयोगाने या उमेदवारांना 17 जुलैपर्यंत संगणक आधारित परीक्षा प्रणाली पोर्टलला भेट देण्याचे आणि उत्तम खेळाडू श्रेणी अंतर्गत यात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. गोवा पोलिस दलात सध्या कर्मचार्यांची कमतरता भासत आहे. राज्य सरकारने पोलिसांसाठी 10,782 विविध पदे मंजूर केली आहेत. त्यापैकी केवळ 9,782 रिक्त पदे भरली आहेत. पीएसआयएसची एकूण 215 पदे रिक्त असून पोलिस उपअधीक्षक पदाची 28 पदे दोन वर्षांहून अधिक काळ रिक्त आहेत.
थेट भरतीबाबत, 2023 मध्ये डीवायएसपींच्या थेट भरतीच्या 28 रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर प्रक्रियाही झाली मात्र ती भरतीच रद्द करण्यात आली होती.