

पणजी : पुढारी वृत्तसेवा
वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेडने (जीएसएल) सोमवारी भारतीय नौदलासाठी तीन अत्याधुनिक युद्धनौका बांधण्याकरिता संरक्षण मंत्रालयासोबत (एमओडी) आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या करारावर स्वाक्षरी केली. संरक्षण मंत्रालयाने आठ अत्याधुनिक जहाजांच्या निर्मितीसाठी ५३,८६६.५ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली.
नौदलासाठीच्या एनजीसी जहाजांच्या बांधकामाची जबाबदारी जीसीएल घेणार असून, उर्वरित पाच जहाजे बनवण्याची जबाबदारी गार्डन रीच शिपयार्ड लिमिटेड, कोलकाता यांची असेल. हा करार जीएसएलसाठी एक मैलाचा दगड असून, देशातील प्रमुख संरक्षण जहाजबांधणी कंपन्यांपैकी एक म्हणून तिचे स्थान अधोरेखित करतो.
जीएसएलने संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमाने स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे हा करार केला आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे जीएसएलच्या ऑर्डर बुकाला बळकटी मिळते आणि भारताच्या स्वदेशी संरक्षण जहाजबांधणी कार्यक्रमातील एक प्रमुख योगदानकर्ता म्हणून तिचे स्थान अधिक मजबूत होते. भारतीय नौदलाने विकसित केलेल्या स्वदेशी डिझाइननुसार, आधुनिक जहाज बांधणी तंत्रज्ञान आणि प्रगत लढाऊ प्रणालींचा समावेश करून आठ एनजीसी बांधण्यात येतील.
युद्धनौका पृष्ठभागावरील युद्ध, हवाई युद्ध यांसारख्या विविध प्रकारच्या कार्यासाठी सुसज्ज केल्या जातील. हा कार्यक्रम देशाच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन परिसंस्थेला अधिक बळकट करेल. रोजगाराच्या संधी निर्माण करेल. देशांतर्गत पूरक उद्योग, तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना महत्त्वपूर्ण चालना देईल. ही जहाजे आत्मनिर्भर भारत आणि भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाप्रत असलेली भारताच्या वचनबद्धतेची अभिमानास्पद प्रतीक म्हणून उभी राहतील.
आठ एनजीसी जहाजे भारतीय नौदलाने विकसित केलेल्या स्वदेशी बनावटीनुसार बांधली जातील. ज्यात आधुनिक जहाजबांधणी तंत्रज्ञान आणि प्रगत लढाऊ प्रणालींचा समावेश असेल. ही अत्याधुनिक युद्धनौका पृष्ठभागावरील युद्ध, हवाई युद्ध आणि पाणबुडीविरोधी युद्ध यांसारख्या विविध कार्यासाठी सुसज्ज असतील. त्यांच्या समावेशामुळे सागरी निगरानी, संरक्षण मोहीम, प्रतिबंध, किनारी संरक्षण आणि शोध व हल्ला मोहिमा यामधील भारतीय नौदलाच्या क्षमतांमध्ये उल्लेखनीय वाढ होईल.