

वाळपई : सत्तरी तालुक्याच्या अनेक भागांना शुक्रवारी पहाटे वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आणि मालमत्तेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. वाळपई अग्रिशामक दलाचे जवान पहाटेपासून अडथळे दूर करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे दिसून आले.
अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. रस्त्यावर पडलेली झाडे संध्याकाळपर्यंत हटविण्यात आली असली तरी अनेक भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वादळी वाऱ्यामुळे कृषी आणि बागायतीचेही मोठे नुकसान झाले असून आंबा व काजू पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
वाळपई अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण दहा ठिकाणी विविध घटना घडल्या. पहाटे खड़की-७० येथील मैदानाशेजारी झाड कोसळून रस्ता बंद झाला होता, अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन झाड हटविल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. त्यानंतर सावर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातील कुडशे घुमटीजवळ जंगली झाड रस्त्यावर पडल्याने सावर्डे-सोनाळ आणि वाळपई दरम्यानचा संपर्क तुटला होता.
झाड हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. ब्रह्मकरमळी-सत्तरी येथील ब्रह्मा देवस्थानाजवळही मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रस्ता मोकळा केला. सावर्डे-तार येथे रस्त्यावर तसेच विद्युत वाहिन्यांवर झाड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे वाहतूक बंद झाली होती तसेच सावर्डे, तार आणि सोना परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला.
अभिशामक दलाने झाड हटवल्यानंतर वाळपई वीज खात्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. विद्युत वाहिन्यांचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून अनेक खांब मोडले तर वीजवाहिन्या तुटल्या. अडथळे दूर करण्यासाठी ए. एन. देसाई, एम. एस. गावडे, आर. एस. सालेलकर, एस. के. गावकर, डी. आर. देसाई, आर. वाय. नाईक आणि एन. गावस यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
कुमठोळ येथे घरावर झाड कोसळले
दरम्यान, सावर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातील कुमठोळ येथील बुद्रुक करमळी भागात एका घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले. घराचे छप्पर तसेच घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरमालकाला आर्थिक फटका बसला आहे. अरविंद देसाई, सोमनाथ गावकर आणि रुपेश सालेलकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घरावरील झाड हटविले. नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील हेदोडे येथेही रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला होता. सतीश नाईक, प्रसाद नाईक, अविनाश नार्वेकर, आनंद शेटकर, गंगाराम पावणे, अशोक नाईक, प्रतेश गावकर आणि रुपेश गावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील झाड हटविण्यात महत्त्वाचे योगदान दिले.