

पणजी/पेडणे : उसने घेतलेले पैसे आणि कामाच्या वेळी वापरण्यासाठी नेलेला रबराचा मुकुट (क्राऊन) परत न केल्याच्या रागातून आलेक्सी लिवोनोव्ह याने दोन्ही रशियन महिलांचे खून केल्याचा नवा मुद्दा पुढे येत आहे. इतके दिवस आलेक्सी याने पैसे उकळण्यासाठी प्रेमाचे नाटक केले व नंतर हत्या केल्या, अशी चर्चा होती. मात्र, आता आलेक्सीने नाही, तर एलिना वालिवा व एलिना कास्तानोव्हा यांनी घेतलेले पैसे परत न केल्याने खून झाल्याचा नवा ट्विस्ट या खून प्रकरणात आला आहे. तसेच खून केल्यानंतर आरोपी मृतदेहावर उड्या मारत नृत्य करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तशी माहिती दिल्याचा हवाला एका राष्ट्रीय दूरचित्रवाहिनीने दिला आहे.
दरम्यान, आलेक्सी स्पेशल व्हिसावर राज्यात आला होता, अशी माहिती मिळाली आहे. खून झालेल्या दोन्ही फायर डान्सर होत्या.त्यांनीच संशयितांकडून त्याने काही पैसे आणि एक फायर क्राउन (नर्तक डोक्यावर आग ठेवण्यासाठी वापरतात तो रबरचा मुकुट) उसना घेतला होता,असे पोलिस सूत्रांनी सांगितले होते. पैसे आणि मुकुट परत केले नसल्यामुळे त्याने चिडून वेगवेगळ्या दिवशी त्यांच्या खोल्यांमध्ये त्यांचे गळे चिरले, असे सूत्रांनी सांगितले.सूत्रानुसार, हे खून पूर्व नियोजित नव्हते, तर तत्कालिक रागाच्या भरात केले गेले. आलेक्सी अतिशय हट्टी होता आणि त्याला लवकर राग येत असे, असेही सूत्रांनी सांगितले.
आलेक्सी याने किती खून केले याची नेमकी माहिती मिळत नाही. सविस्तर माहिती देऊ नये यासाठी मांद्रे पोलिस निरीक्षक वीरेंद्र नाईक व पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांच्यावर पोलिस अधीक्षकांचा दबाव असावा. त्यामुळेच ते पुढील माहिती पोलिस अधीक्षकच देणार असल्याचे सांगतात.
खून केल्यानंतर तो मृतांच्या देहावर उड्या मारत नृत्य करत असे, अशी माहिती त्याने पोलिसांना दिल्याचे कळते. मात्र,पोलिसांकडून अधिकृत माहिती दिली जात नाही. आलेक्सी डिसेंबर महिन्यात गोव्यात आला होता. आसाम, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या भागात फिरत असताना गोव्यात हरमल, मांद्रे,मोरजी या ठिकाणी वास्तव्य करून होता. सध्या तो मांद्रेतील एका खोलीमध्ये राहत होता. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
वालिवा 10 जानेवारीला आली गोव्यात...
एलेना वालिवा 10 जानेवारी 2026 रोजी रोजी गोव्यात आली होती, तर कास्तानोव्हा गेल्यावर्षी 25 डिसेंबरपासून राज्यात होती आणि संशयितासोबत राहत होती. त्या दोघी देशाच्या विविध भागांमध्ये काम करत असत आणि वारंवार गोव्याला भेट देत असत, असे सूत्रांनी सांगितले.