

पणजीः गेल्या डिसेंबर २०२५ मध्ये राज्यात २९ प्राणघातक रस्ते अपघात झाले. त्यात ३० जणांचा मृत्यू झाला, २०२३, २०२४ च्या शेवटच्या महिन्यात अनुक्रमे २३ आणि २४ अपघात झाले होते. त्या तुलनेत ही संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी होत आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, प्राणघातक रस्ते अपघात म्हणजे मृत्यूला कारणीभूत असलेला अपघात, तर रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता दर्शवते. जीवघेण्या रस्ते अपघातांमध्ये वाढ ही वाहतूक कोंडीमुळे होते. पोलिसांनी २०२५ मध्ये प्राणघातक अपघात १० टक्के कमी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. पर्यटन हंगामातवाहनांच्या संख्येत होणारी वाढ आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन ही अपघातांना कारण ठरली आहेत. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, गोव्यात प्राणघातक रस्ते अपघातांमध्ये २३ टक्के, तर मृत्यूंच्या संख्येत २५ टक्के घट झाली. अनेक वर्षांनी सरासरी दररोज एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर वाहतूक सुरक्षेचे सकारात्मक परिणाम दिसून आले होते. २०२५ च्या चौथ्या तिमाहीत, प्राणघातक अपघातांमध्ये ही घट फक्त ६ टके आणि रस्ते अपघातांमध्ये ४ टक्के पर्यंत कमी झाली. ही खरेतर चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वाधिक अपघात सायंकाळी...
अपघात कमी करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी करणारे पत्र वाहतूक शाखेने पीडब्ल्यूडीला लिहिले. २०२४ मधील अपघातांच्या विश्लेषणातून असे दिसून आले की, जास्तीत जास्त अपघात संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत झाले. प्रत्येकजण घरी परतण्याची घाई करत असल्याने कार्यालयीन वेळेनंतर अपघातांची संख्या जास्त असते, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले
जागृतीसाठी ७०० हून अधिक व्याख्याने...
वाहतूक शाखेने शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायतींमध्ये मोहिमा राबवून जागरूकता मोहीम वाढवली. ७०० हून अधिक व्याख्याने आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये ४०,००० हून अधिक लोकांना वाहतूक नियमांबद्दल शिक्षित करण्यात आले.