Goa Monsoon update | राज्यात 24 तासांत विक्रमी पाऊस

पावसाचा जोर ओसरला; पारोडा भागांत 2 हजार लोकांना दिलासा, मात्र गैरसोय कायम
Weather Update
राज्यात पुढील 3 दिवस हलका पाऊस; 10 जूनपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाहीFile Photo
Published on
Updated on

पणजी : राज्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस किंचित ओसरला आहे. मागील 24 तासांत विक्रमी 59.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी आणि बुधवारी झालेल्या पावसाचा प्रभाव अजूनही अनेक ठिकाणी जाणवत आहे. मुसळधार पावसामुळे साचलेले पाणी धिम्या गतीने कमी होत आहे. वेधशाळेने शनिवारीही मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.

वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 24 तासांत 59.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत 1063.9 मि.मी. पाऊस अपेक्षित असताना 1086.9 मि.मी. पाऊस झाला आहे. 17 जूनपासून 23 आणि 24 जूनचा पाऊस वगळता पाऊस सरासरीपेक्षा कमी, तुटीत पडत होता. मात्र बुधवारी एका दिवसात पडलेल्या पावसाने ती तूट भरून निघाली असून आता वाढीव पाऊस पडत आहे. उद्या 5 जुलैलाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 6 जुलैपासून 10 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक पाऊस धारबांदोड्यात

मागील 24 तासांत सर्वाधिक पाऊस धारबांदोडा येथे 99.1 मि.मी. झाला आहे. त्या खालोखाल सांगेत 96.5, केपेत 70, पणजीत68, फोंड्यात 65, दाबोळीत 61 तर मडगावात 59 मि.मी. इतका विक्रमी पाऊस राज्यात झाला आहे.

देसाईवाडा, मुळस, कुर्यादवासीयांचे हाल

मडगाव : कुशावती नदीला आलेल्या पुरात गुरुवारी पारोड्याचा मुख्य रस्ता बुडाला होता. गावातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या दुसर्‍या रस्त्याच्या मधोमध भेग पडल्यामुळे ‘इकडे आड तर तिकडे विहीर’ अशी अवस्था पारोड्यातील देसाईवाडा, मुळस, कुर्याद, या तीन गावांतील सुमारे दोन हजार लोकांची मोठी गैरसोय झाली.

मागील 24 तासांपासून पारोडा गाव आणि मडगावला जोडणारा एकमेव रस्ता पाण्यात बुडाला होता. मात्र, शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर ओसरल्यामुळे पूर काहीसा ओसरला. लोकांना दिलासा जरी मिळाला असला तरी गैरसोय कायम आहे. पुरामुळे शेकडो लोक गावात अडकले होते. आजारी असलेल्या वृद्धांना उपचारासाठी इस्पितळात नेता येत नव्हते. नोकरदार मंडळी कामाला जावू शकली नाहीत. गावात पूर आल्यानंतर चंद्रेश्वर पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या पण पर्यायी रस्त्याचा वापर या भागातील ग्रामस्थ करत होते. हा पर्यायी रस्ता थेट गुडी येथे मुख्य रस्त्याला जोडलेला आहे. बर्‍याच वर्षांपासून या पर्यायी रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. रस्त्याला मधोमध एक मोठे भगदाड पडल्यामुळे रस्ता मधोमध खचला आहे. तो भरून काढल्याशिवाय त्यावरून सायकलसुद्धा नेता येत नाही, अशी माहिती माजी आमदार क्लाफासिओ डायस यांनी दिली आहे.

स्थानिक नागरिक संतोष पर्वतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या जुन्या रस्त्याच्या बाजूने एक चिखलाची वाट असून गावातील काही युवकांनी आपली वाहने त्या वाटेवरून नेण्याचा प्रयत्न केला होता मात्र वाहनांचे चाक चिखलात रुतल्याने वाहने तिथेच अडकली. रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून प्रवास करणे अतिशय धोक्याचे आहे. गुरुवारी सायंकाळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. शुक्रवारी कुंकळ्ळीचे माजी आमदार क्लाफासिओ डायस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून गावकर्‍यांसाठी पर्यायी असलेला मार्ग तत्काळ दुरुस्तीची मागणी त्यांनी केली आहे.

कुशावती नदीच्या पुरात पारोडा गाव बुडणे ही नवीन बाब नाही. दरवर्षी पावसाळ्यात नदीचे पाणी रस्त्यावर येऊन रहदारीचा एकमेव मार्ग पाण्याखाली जात असल्यामुळे गावातील सुमारे दोन हजार नागरिक त्या पर्यायी रस्त्याचा वापर करून बाहेर पडत होते. आता तर रस्त्याची लोकांना नितांत आवश्यकता असून रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता त्या रस्त्याचा वापर करणे अशक्य झाले आहे. पंचायतीकडून रस्ता दुरुस्तीचे काम न झाल्यामुळे अखेर आपण पुढाकार घेऊन दुरुस्तीकाम हाती घेतल्याची माहिती माजी आमदार क्लाफासिओ डायस यांनी दिली आहे. माजी सरपंच दीपक खरंगटे यांनी नाराजी व्यक्त करताना रस्त्याची वेळीच दुरुस्ती झाली असती तर आज त्या पुराचा प्रभाव या तिन्ही गावांना जाणवला नसता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सुस्त प्रशासनाचा नमुना

या संदर्भात, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, सरकारची आपत्कालीन यंत्रणा फक्त नावापुरती आहे. कुशावती नदीला पूर आल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीसाठी येणे अपेक्षीत होते. सरकारला लोकांची काळजी असती तर तत्काळ उपाय योजना युद्धपातळीवर राबवल्या असत्या. लोकांचा जीव टांगणीला लागला असताना मुख्यमंत्री दिल्लीवारी करत आहेत. त्यांनी आपत्कालीन यंत्रणेस सूचना करणे अपेक्षीत होते.

पहाटे मुख्य रस्त्यापर्यंत पाणी

गुरुवारी पहाटे कुशावती नदीला आलेल्या पुराचे पाणी पारोडाच्या मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचले होते. गुरुवारी दुपारपर्यंत मडगाव आणि केपेला जोडणारा प्रमुख रस्ता पुराच्या पाण्यात बुडाला होता. पुरामुळे मडगाव मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुराचे पाणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत कमी झालेले नव्हते. त्याचा सर्वात जास्त त्रास पारोडावासीयांना झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news