

मयुरेश वाटवे
गेल्या पंचवीस-तीस वर्षांत राजकारणाची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. एक काळ असा होता, की आमदार म्हणजे वर्षातून एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणारा, केवळ विधानसभा अधिवेशनांत उपस्थिती लावणारा आणि निवडणुकीच्या वेळीच गावात फिरणारा नेता. मुख्यमंत्री तर केवळ सरकारी कार्यक्रमांपुरतेच मर्यादित असायचे. त्यांचा दौरा म्हणजे लाल दिव्याची गाडी, पुढे-मागे पोलीस, हार-तुरे आणि भाषण. सर्वसामान्य मतदाराला नेत्याला भेटणे म्हणजे मोठी गोष्ट वाटायची.
पण आज काळ पूर्णपणे बदलला आहे. आज आमदार असो की मुख्यमंत्री, त्याला पाचही वर्षे, तीनशे पासष्ट दिवस, पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरावे लागते. सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकपासून ते रात्री अकरा वाजताच्या गणपतीच्या आरतीपर्यंत, लग्नाच्या रिसेप्शनपासून ते कोणाच्या तरी अंत्यविधीपर्यंत प्रत्येक ठिकाणी नेता हजर असावा, अशीच मतदाराची अपेक्षा झाली आहे. या बदललेल्या कार्यसंस्कृतीत जो टिकेल, तोच राजकारणात राहील. जो थकेल, तो बाद होईल. हा नियम आता कोणालाही चुकणार नाही.
पूर्वीचे राजकारण हे सुशेगाद होते. आमदार झाला म्हणजे पाच वर्षे आरामात जायची. लोकांच्याही फार अपेक्षा नसत. नोकरी, एखादे काम, एखादी शिफारस, एवढ्यापुरतेच राजकारण मर्यादित होते. पण आजचे मतदार बदलले आहेत. आजचा मतदार जागरुक आहे. त्याला आमदार केवळ विधानसभेत काय बोलला, याच्याशी देणे-घेणे नाही.
तो विचारतो, माझ्या वॉर्डात आमदार किती वेळा आला? माझा फोन उचलला का? थोडक्यात माझी कामे झाली की नाही एवढ्याशीच त्याला देणेघेणे. अनेक सर्वेक्षणांतून हे सिद्ध झाले आहे की विधानसभेतील आमदारांची कामगिरी, त्यांनी किती प्रश्न विचारले, किती विधेयकांवर चर्चा केली, यावर कुणीही मतदान करत नाही.
मतदान होते ते आमदाराच्या उपलब्धतेवर, त्याच्या संपर्कावर आणि मतदाराला होणाऱ्या वैयक्तिक लाभावर. मतदाराला अभ्यासू आमदारापेक्षा आपली वैयक्तिक कामे करणारा आमदार हवा आहे. कायदे करणाऱ्या आमदारापेक्षा आपल्यासाठी कायदे वाकवणारा आमदार अधिक लोकप्रिय. दुर्दैवी असले तरी हेच सत्य आहे.
या सगळ्या अपेक्षांचे ओझे घेऊन फिरणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर प्रचंड ताण सहन करणे आहे. त्यामुळे आजच्या राजकारणात शारीरिक फिटनेस हा एक अनिवार्य निकष झाला आहे.
तुम्ही कितीही अभ्यासू असा, कितीही अनुभवी असा, पण तुम्ही दिवसातले अठरा तास उभे राहू शकत नसाल, चार-चार कार्यक्रमांना धावपळ करू शकत नसाल, उन्हातान्हात फिरू शकत नसाल, तर तुम्ही या शर्यतीत टिकू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर गोव्यातील काही जुन्या नेत्यांच्या अजून ‘एकच चान्स द्या’ या आवाहनाचा विचार करावा लागतो. त्यांचा अनुभव, त्यांचे पूर्वीचे काम, त्यांची निष्ठा याबद्दल कोणालाही शंका नाही.
पण त्यांनी स्वतःच आरशात पाहून विचार करण्याची वेळ आली आहे की, आजच्या या वेगवान, दगदगीच्या राजकारणाच्या निकषांत आपण कुठे बसतो आहोत? डॉ. प्रमोद सावंत, रोहन खंवटे, मायकल लोबो, जीत आरोलकर, विजय सरदेसाई यांच्यासारखी ऊर्जा किती जणांकडे आहे?
प्रमोद सावंत सकाळपासून रात्रीपर्यंत कार्यक्रम, बैठका, दौरे, दिल्लीच्या फेऱ्या करतात. रोहन खंवटे यांची पर्यटन, माहिती तंत्रज्ञान या खात्यांतील धावपळ, शिवाय मतदारसंघातील उपलब्धता पाहिली तर थकवा येतो.
मायकल लोबोही नेहमी उपलब्ध असतात. सकाळी कळंगुटमध्ये तर दुपारी म्हापशात दिसतात तर संध्याकाळी शिवोलीत. जीत आरोलकरही मतदारसंघात युवा, महिलांसाठी सतत कार्यक्रम घेत असतात. कधी सांस्कृतिक कार्यक्रम तर कधी स्पर्धा. विजय सरदेसाईही सतत कार्यरत असतात.
ही ऊर्जा केवळ वयाची नाही, ती मानसिकतेची आहे. सतत लोकांत राहण्याची, सतत काम करण्याची, सतत उपलब्ध राहण्याची मानसिकता. ती प्रत्येकाकडे असतेच असे नाही. अनेक जुन्या नेत्यांची अडचण अशी आहे की त्यांना अजूनही वाटते की आपण एकदा मोठी सभा घेतली, एकदा मोठे भाषण केले, म्हणजे निवडणूक जिंकू. ते दिवस आता गेले आहेत. आता लोकांशी दैनंदिन संपर्क महत्त्वाचा असतो. सतत उपलब्ध असणे गरजेचे असते.
एखादा नेता केवळ आपल्या पूर्वपुण्याईवर, आपल्या नावावर, आपल्या समाजाच्या मतांवर निवडणूक लढवून जिंकण्याची मनीषा बाळगत असेल तर तो स्वत:ची फसवणूक करत आहे. तो जिंकला तरी मतदारांना हवे ते देऊ शकणार नाही. मग अशा नेत्याने एक जागा का अडवावी? हा प्रश्न केवळ जुन्या नेत्यांना नाही, तर विद्यमान आमदारांनाही लागू होतो. आमदार असल्यामुळे त्यातील बहुतेकांना उमेदवारी मिळेल, हे खरे आहे. पक्ष विद्यमान आमदाराला केवळ वयाकडे बोट दाखवून तिकीट नाकारण्याची शक्यता नाही.
पण कधी ना कधी त्यांनाही याबाबत विचार करावाच लागणार आहे. मतदार म्हणतो, ‘झेपत नसेल तर बाजूला व्हा, दुसऱ्याला संधी द्या.’ लोकशाहीत कोणतीही जागा ही कोणाचीही जहागीर नसते. ती जनतेची असते. आणि जनतेची सेवा करण्यासाठी तुमच्याकडे ऊर्जा नसेल, वेळ नसेल, फिटनेस नसेल, तर ती जागा अडवून ठेवणे म्हणजे जनतेचा विश्वासघात आहे. प्रत्येकाने सन्मानाने निवृत्ती घ्यावी.
क्रिकेटमध्ये सुनील गावसकर यांनी योग्य वेळी निवृत्ती घेतली म्हणून त्यांचा सन्मान आजही कायम आहे. राष्ट्रीय राजकारणात अंथरुणाला खिळूनही राजकारण करणारे अनेक जण आपण पाहिले आहेत. त्यांना वाटते की आपण गेलो तर पक्ष संपेल, मतदारसंघ संपेल. प्रत्यक्षात असे काही होत नाही. नवीन रक्त आले की पक्ष अधिक ताजातवाना होतो. नवीन विचार येतात, नवीन ऊर्जा येते, नवीन कार्यपद्धती येते.
आज गोव्यात अनेक तरुण कार्यकर्ते आहेत, जे पंचायत, नगरपालिका, जिल्हा पंचायत यात काम करून तयार झाले आहेत. त्यांचा अभ्यास आहे, त्यांना तंत्रज्ञान कळते, त्यांना सोशल मीडियाचा वापर कळतो, त्यांना मतदाराशी कसे बोलायचे हे कळते. त्यांना केवळ एक संधी हवी आहे. पण जुन्या नेत्यांनी जागा अडवून ठेवल्यामुळे त्यांना ती संधी मिळत नाही. त्यामुळे ते नाराज होतात, पक्ष सोडतात, अपक्ष उभे राहतात आणि मग मतविभागणी होते. त्याचा फटका शेवटी पक्षालाच बसतो.
राजकीय कार्यसंस्कृती झपाट्याने बदलते आहे. आता विधानसभेतील अभ्यास महत्त्वाचा आहेच, पण त्यापेक्षा मतदारसंघातील अभ्यास अधिक महत्त्वाचा झाला आहे. कोणाच्या घरात कोण आजारी आहे, कोणाच्या मुलाचे लग्न आहे, कोणाच्या वॉर्डात लाईट नाही, हे सगळे आमदाराला बघावे लागते. त्यामुळे आता प्रत्येक पक्षाने आणि प्रत्येक नेत्याने स्वतःसाठी काही निकष ठरवले पाहिजेत. मी दिवसातले किती तास लोकांसाठी देऊ शकतो?
मी आठवड्यातून किती दिवस मतदारसंघात राहू शकतो? मी शारीरिकदृष्ट्या या धावपळीसाठी तयार आहे का? माझ्याकडे नवीन पिढीशी संवाद साधण्याची क्षमता आहे का? या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक असतील, तर सन्मानाने बाजूला होणे योग्य ठरेल. जे बाजूला होणार नाहीत, त्यांना मतदार बाजूला करतील. येत्या विधानसभा निवडणुकीत अनेक नवीन चेहरे दिसतील तेव्हा याची प्रचिती येणारच आहे.