

पणजी : विद्यमान विधानसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा कालावधी बाकी असताना राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी, विद्यमान आमदारांची, मंत्र्यांची कामगिरी यासह मतदार संपर्क यात्रा सुरू केल्या आहेत. यात भाजपच्या वतीने ‘संकल्प से सिद्धी’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानाचा आधार घेत ‘बूथ चलो’ अभियान सुरू केले आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस ‘संविधान बचाव’ यात्रेला रविवार, 8 रोजीपासून सुरुवात करणार आहे.
मागील विधानसभा निवडणूक मार्च 2022 मध्ये झाली होती. त्यानुसार येणारी विधानसभेची निवडणूक मार्च 2027 मध्ये होणे अपेक्षित आहे. यासाठी जानेवारी 2027 मध्ये आचारसंहिता लागेल, अशी शक्यता गृहीत धरल्यास विद्यमान विधानसभेला अद्यापही दीड वर्ष बाकी आहे. असे असताना भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर सुरू केलेल्या ‘संकल्प से सिद्धी’ या अभियानाचा आधार घेत राज्यात ‘बूथ चलो’ अभियान सुरू केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवार, 7 रोजी साखळी येथील एका बूथवर हजेरी लावत तेथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मतदारांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेतले. याबरोबरच हे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेशही त्यांनी अधिकार्यांना दिले. दुसरीकडे राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मतदारांना भेटण्यासाठी ‘संविधान बचाव’ अभियानाला रविवारपासून सुरुवात करण्याचे ठरविले आहे. या अभियानाला उत्तर गोव्यातील मांद्रे मतदारसंघापासून सुरुवात होईल. ही यात्रा राज्यातील चाळीसही मतदारसंघांत जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली आहे. दुसरीकडे पडद्यामागच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.
विद्यमान आमदार, मंत्री यांच्या कामाचा आणि कामगिरीचा आढावा घेतला जात आहे. याशिवाय इतर उमेदवारांचीही चाचपणी सुरू आहे. हेच काम काँग्रेससह आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि आरजी पक्षाने सुरू केले आहे. अर्थात, प्रत्यक्ष मतदारांशी किंवा नागरिकांशी संपर्क करण्यामध्ये सध्या तरी सत्ताधारी भाजप आघाडीवर आहे.
कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय हवा गरम झाली होती. आता कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ फेरबदल होणार अशी चर्चा होती. मात्र, त्याबाबतही फारसा उत्साह दिसून येत नाही. सगळ्यांची रागाची पट्टी खाली आली आहे. चालढकल मागील पानावरून पुढे सुरू आहे.