

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
सासष्टी तालुक्यातील नुवे परिसरात राहणाऱ्या ८७ वर्षीय वृद्ध महिलेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मायणा-कुडतरी पोलिसांनी संशयित स्टॅन्ली कुतिन्हो याच्याविरुद्ध बलात्कार, बेकायदेशीर प्रवेश, बळजबरी आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. संशयित फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला एकटी असताना संशयिताने बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्याशी अश्लील वर्तन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडित महिलेच्या सुनेने मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक चौकशीनंतर संशयित स्टॅन्ली कुतिन्हो याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत केली आहेत.
दरम्यान, तपासात स्टॅन्ली कुतिन्हो हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध म्हापसा पोलिस ठाण्यात 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा नोंद असून, वेर्णा पोलिस ठाण्यातही त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.
घटनेनंतर पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अहवाल आणि अन्य पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.
मायणा-कुडतरी पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्हेरोनिका कुतिन्हो या प्रकरणाचा तपास करीत आहेत.