

पणजी : नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांच्या दोना पावला येथील निवासस्थानावर मोर्चा काढल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, आमदार वेंझी व्हिएगस, आमदार क्रुझ सिल्वा, आरजीपी अध्यक्ष मनोज परब, आपचे अध्यक्ष वाल्मिकी नाईक, अजय खोलकर, गोविंद शिरोडकर, सेसिल रॉड्रिग्स, स्वप्नेश शेर्लेकर, रामा काणकोणकर यांच्यासह सुमारे १,५०० लोकांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. तिसवाडीचे सह मामलेदार आणि कार्यकारी दंडाधिकारी रामकृष्ण साळगावकर यांनी पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
यामध्ये बेकायदा आंदोलन करणे, मंत्री राणे यांच्या घरावर चालून जाणे, रस्ता बंद करून आठ तास वाहतुकीला अडथळा करणे इत्यादी कलमांचा समावेश आहे. मागच्या शनिवारी आमदार वीरेश बोरकर यांनी सांत आंद्रे मतदारसंघातील कलम ३९ (अ) नुसार प्रस्तावित झोन बदल रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी पाळे शिरदोन ग्रामस्थांसह नगर नियोजन खात्याच्या पाटो येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.
यावेळी पोलिसांनी आमदार बोरकर यांना कार्यालयातून बळजबरीने बाहेर काढले होते. त्यानंतर बोरकर यांनी आपली मागणी पूर्ण होईपर्यंत, आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. याला काँग्रेस आणि आपच्या आमदारांनी पाठिंबा दिला होता.
त्यानुसार सोमवारी दि. २३ फेब्रुवारी रोजी नगर नियोजन कायद्यातील कलम ३९ (अ) रद्द करण्याबाबत आझाद मैदानातून मंत्री विश्वजित राणे यांच्या दोना पावला येथील बंगल्यावर मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलक अनेक तास मंत्री राणे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या मांडून बसले होते.
दरम्यान, बुधवार दि. २५ रोजी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्र्यांच्या घरांवर मोर्चा काढण्याची कृती चुकीची असल्याचे म्हटले होते. आंदोलनात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्यांना नोटिसा येऊ लागल्या आहेत. यामध्ये त्यांना पणजी पोलीस स्थानक, ताळगाव पोलीस आऊट पोस्ट अथवा दोना पावला पोलीस दूरक्षेत्रात येऊन भेटण्याचे आदेश नोटिसीद्वारे देण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपेश शेटकर तपास करीत आहेत.
कलम ३९ (अ) विरोधात दोना पावला येथे झालेल्या आंदोलनामुळे सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातूनच या आंदोलनात सहभागी झालेल्यांविरोधात गुन्हे नोंद करून चौकशीसाठी बोलावले जात आहे. आमच्यात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही घाबरणार नाही, उलट कलम ३९ (अ) विरोधात आणखी तीव्रपणे लढा देऊ, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस कुएल्हो यांनी दिला आहे.