

पणजी : रस्त्यालगत बेपर्वाईने टाकलेला प्लास्टिकमिश्रित कचरा गुरांच्या जिवावर उठत असून, राज्यातील गोशाळांमध्ये गेल्या चार वर्षांत पोटात प्लास्टिक अथवा कचरा गेल्याने दोन हजार ३८० गुरांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी केवळ गोशाळांमधील असून, गोशाळेत न पोहोचलेल्या मोकाट गुरांच्या मृत्यूची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
बेजबाबदारपणे ओला-सुका कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांत भरून रस्त्याकडेला टाकला जातो. अन्नाच्या शोधात रस्त्यावर फिरणारी गुरे अन्नासोबत प्लास्टिकही गिळतात. हे प्लास्टिक पचत नसल्याने त्यांच्या पोटात साचते. परिणामी अंतर्गत अवयवांवर परिणाम होऊन विविध वैद्यकीय समस्या निर्माण होतात आणि काही प्रकरणांत गुरांचा मृत्यू होतो.
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पोटात प्लास्टिक अथवा कचरा गेल्याने २८९ गुरांचा मृत्यू झाला. २०२३-२४ मध्ये ४४३, २०२४-२५ मध्ये एक हजार, तर २०२५-२६ मध्ये ६४८ गुरांचा मृत्यू झाला. चार वर्षांची ही संख्या दोन हजार ३८० इतकी आहे. म्हणजेच या कारणामुळे महिन्याला सरासरी सुमारे ५० गुरे, तर दररोज एकापेक्षा अधिक गुरांचा मृत्यू झाल्याचे दिसते.
गोशाळेत आणण्यापूर्वीच भटक्या
गुरांच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गेलेले असते. त्यामुळे उपचार करूनही अनेकदा त्यांना वाचवणे शक्य होत नाही. याच कालावधीत अन्य वैद्यकीय कारणांमुळे विविध गोशाळांमध्ये १४१ गुरांचा मृत्यू झाला.
अपघातांतही २,०५० मृत्यू
राज्यात गेल्या चार वर्षांत अपघातांत जखमी झालेल्या दोन हजार ५० गुरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. प्लास्टिकप्रमाणेच पोटात गेलेले धातूचे तुकडेही गुरांच्या आरोग्यासाठी घातक ठरतात.
दहा गोशाळांना अनुदान
राज्य सरकारकडून सध्या १० गोशाळांना अनुदान दिले जात असून, त्यासाठी ८४ कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा गोशाळेकडून वापर प्रमाणपत्र सादर न झाल्यास अनुदानाचा निधी तात्पुरता रोखला जातो. सध्या या १० गोशाळांमध्ये एकूण आठ हजार १२८ गुरे आहेत.
गोशाळांमध्ये मृत्यू पावलेली गुरे
२०२२-२३ : २८९
२०२३-२४ : ४४३
२०२४-२५ : १,०००
२०२५-२६ : ६४८
एकूण : २,३८०
राज्यातील १० गोशाळांना अनुदान
अनुदानाची रक्कम ८४ कोटी रुपयांहून अधिक
१० गोशाळांमध्ये ८,१२८ गुरे