

Omkar Elephant Attack Kalne bull killed
पणजी : गोव्यातून ओंकार हत्ती बुधवारी (दि.१०) सायंकाळी कळणे येथे दाखल झाला. सध्या तो कुंब्रलच्या पुढे शिरवल परिसरात आहे. मात्र, रात्रीच्या प्रवासात त्याने एका घराशेजारच्या शेतात बांधलेल्या बैलावर हल्ला केला. या हल्ल्यात तो बैल मृत्युमुखी पडला. एक गाय आणि एका बैलाला त्यांची दावी सोडून वन कर्मचाऱ्यांनी वाचवले.
या बैलालाही वाचवण्याचा प्रयत्न वन कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, बैल मारण्यासाठी अंगावर येऊ लागल्याने त्याला वाचवता आले नाही. बैल मालक शाहीर इस्माईल खान यांचे ३५ ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. वन विभागाने पंचनामा केला असून नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.
कळणे प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या मागे खान यांचे जुने घर आणि शेती आहे. तर नवे घर कळणे बाजारपेठेत आहे. जुन्या घरात कुणी राहत नाहीत. नव्या घरातील कुटुंबीय बांदा येथील एका कार्यक्रमाला गेले होते. ते घरी असते, तर ओंकारचा वावर लक्षात घेऊन त्यांनी गुरे सोडून घातली असती आणि अनर्थ टळला असता, असे कळणे भिकेकोनाळ ग्रामपंचायतीचे सरपंच अजित (बॉबी) देसाई यांनी सांगितले.
ओंकारला बुधवारी आणि गुरूवारी दिवसभर वन कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, ओंकारप्रेमी यांनी गोवा सीमेवरील फकिरफाटा - डोंगरपाल येथून काल संध्याकाळी कळणेपर्यंत तर आज सकाळी भिकेकोनाळ येथून कुंब्रल, शिरवलपर्यंत डांबरी व जंगल भागातील रस्त्याने त्याच्यासमोर अगदी दोन - चार फुटांवर चालत बोलावून नेले. या प्रवासात तो शांतपणे त्यांच्या सूचना पाळत होता. त्याने कुणालाही इजा केली नाही किंवा अंगावर धावून गेला नाही. माणसांना काहीही न करणारा ओंकार जनावरांच्या बाबतीत असा का वागतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.