

वास्को : शहर भागातील एका इमारतीच्या तळमजल्यावरील बीफ दुकानातील बीफ विक्री बंद करण्यासंबंधी मुरगाव पालिकेने नोटीस दिली आहे. सदर दुकानातील बीफमुळे तेथे दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच शहर भागातील मुरगाव पालिका मार्केटबाहेरची बीफ दुकानेही तेथून स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे समजते.
सदर दुकाने भर बाजारपेठेतील रस्त्याकडेला असल्याने काहीजणांनी काही नगरसेवकांकडे नाराजी व्यक्त केली आहे. तळमजल्यावर बीफ विक्री करणाऱ्या त्या विक्रेत्याकडे बीफ विक्री करण्याचा कोणताही परवाना नाही.
त्याने तेथे कोल्ड स्टोरेज यासाठी परवाना घेतला होता. तथापि त्यानंतर त्या विक्रेत्याने तेथे बीफ विक्री सुरु केली. तेथे टांगण्यात येणाऱ्या बीफमुळे तेथून ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधी सहन करावी लागते. तेथील बीफ दुकानांसंबंधी तक्रारी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुरगाव पालिका मंडळ बैठकीत सदर विषय चर्चेत आला होता. त्यावेळी तळमजल्यावर इतर दुकानांच्या मधोमध असलेल्या बीफ दुकानासंबंधी चर्चा झाली होती. त्या बीफ विक्रेत्यांची परवाने तपासण्यात आले तेव्हा त्यांच्याकडे बीफ विक्रीचे कोणताही परवाना नसल्याचे उघडकीस आले.