

पणजी : लोढा गृहनिर्माण मेगा प्रकल्पाविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या सर्वण-कारापूर ग्रामस्थांना क्रांतिदिनी पणजीतील आझाद मैदानावर जाण्यापासून पोलिसांनी रोखले. त्यामुळे संतप्त आंदोलनकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
आंदोलनाला ७० हून अधिक दिवस उलटूनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी यापूर्वीच इशारा दिला होता. त्यानुसार क्रांतिदिनी मोठ्या संख्येने आझाद मैदानाकडे कूच करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सकाळपासूनच आझाद मैदान परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलकांना अटक करणे घटनाविरोधी : केजरीवाल
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कारापूर येथील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला. लोढा मेगा प्रकल्पाविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांना अटक करणे हे लोकशाहीविरोधी असल्याचे सांगितले. भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीचा अवलंब करत असल्याची टीका केजरीवाल यांनी केली.