

पणजीः सरकारच्या पर्यटन विकास महामंडळातर्फे नार्वे येथे 11 कोटी खर्च करुन आरती घाट बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाजवळ आखाडा व जवळच्या गावातील लोक वापरत असलेली स्मशानभूमी आहे. ती स्मशानभुमी या प्रकल्पासाठी हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मात्र सरकारच्या या प्रयत्नांना कुंभारजुवेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेश फळदेसाई यांच्यासह परिसरातील सर्व गावातील लोकांनी विरोध केला असून आरती घाट बांधताना स्मशानभूमीची जागा सोडावी नपेक्षा सदर प्रकल्प बंद पाडू आणि सरकार विरोधात आंदोलन करु असा इशारा आमदार फळदेसाई यांनी दिला आहे. येत्या तीन दिवसांमध्ये यावर तोडगा काढावा नपेक्षा लोकांना घेऊन आपण आंदोलन करणार आहे. असेही ते म्हणाले. रविवारी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी ॲड. सुहास वळवईकर व आखाडा भागातील नागरिक उपस्थित होते.
फळदेसाई म्हणाले की नार्वे तीर्थ येथे 11 कोटीचा आरती घाट सरकार बांधत आहे, आखाडा व परिसरातील अनेक गावचे लोक वापरत असेलली जुनी स्मशानभुमी हटवून हा प्रकल्प बांधला जाणार आहे. रविवारी कंत्राटदाराच्या लोकांनी या स्मशानभूमीचे गेट वगैरे हटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संघर्ष निर्माण झाला आहे. स्मशानभूमी आहे तेथेच ठेवायला हवी. यासाठी सोमवारी आपण मुख्यमंत्र्याना भेटणार आहे.
बधवारपर्यंत तोडगा निघाला नाहीतर आरती घाट प्रकल्प आम्ही बंद पाडू व आंदोलन करु. असा इशारा फळदेसाई यांनी दिला. स्मशानभूमीसाठी तीनशे मीटर जागा ठेवून इतर भागात आरती घाट बांधावा, लोकांची स्मशानभूमी तोडून आरती घाट येथे नकोच. त्याला आपला ठाम विरोध आहे. स्मशानभूमीसाठी दुसरी जागाही आम्ही स्वीकारणार नाही असे फळदेसाई यांनी सांगितले.