Goa News | खवळलेला समुद्र, वादळी वारे ; बहुतांश ट्रॉलर अजूनही किनाऱ्यावरच, मासेमारी हंगामाची सुरुवात लांबणार!

सर्वसाधारण १ ऑगस्टला सुरु होतो हंगाम
Goa News
पणजी : किनाऱ्यावर उभे असलेले ट्रॉलर्स. (छाया : प्रभाकर धुरी)
Published on
Updated on

पणजी : समुद्रातील मासेमारीचा हंगाम १ ऑगस्ट रोजी सुरू होत असला,तरी अद्याप बहुतांश ट्रॉलर किनाऱ्यावरच आहेत. खवळलेला समुद्र, मजुरांची कमतरता, आणखी काही दिवस मासेमारीसाठी न जाण्याचा हवामान खात्याने दिलेला इशारा यामुळे यावर्षीचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ट्रॉलर मालक व स्थानिक मच्छीमारांशी चर्चा केली असता, हंगाम चार दिवसांपासून पंधरा दिवसांपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मालीम जेटीवर सुमारे ३०० ते ४०० ट्रॉलर आहेत. या ट्रॉलरच्या, मच्छीमार बोटींच्या आकारानुसार अगदी ८ ते १०,२० ते ३० आणि ४० व त्यापेक्षा अधिक कामगार कामाला असतात. बहुतेक कामगार झारखंड, बिहार, छत्तीसगड येथील असतात. काही ट्रॉलरवरचे कामगार गोव्यात पोचले आहेत, तर काही आलेले नाहीत. त्यामुळे बऱ्याचशा ट्रॉलर्सला बांधलेले प्लास्टिकही सोडण्यात आलेले नाही.

गोव्याहून मुंबईला मासे नेण्यासाठी आलेल्या एका ट्रकचालकाने सांगितले की, आम्ही मासे नेण्यासाठी आलो. पण, ट्रॉलर्स अजून समुद्रात गेलेले नाहीत. कधी जातील हे सांगता येत नाही.त्यामुळे अजून चार-पाच दिवस थांबावे लागण्याची शक्यता आहे.

एका ट्रॉलर मालकाने सांगितले की, समुद्र खवळलेला आहे. हवामान प्रतिकूल आहे. त्यामुळे समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. वातावरणात बदल न झाल्यास हंगामाची सुरुवात १५ दिवस लांबणीवर पडण्याची भीती आहे.

दरम्यान, समुद्रात निर्माण होणारे तुफान आणि मोठ्या लाटांमुळे बोटी पाण्यात उतरविणे कठीण झाले असून, पावसाचे गोडे पाणी समुद्रात न मिसळल्याने मासे खोल समुद्रातच अडकून पडले आहेत. यामुळे ९० दिवसांच्या बंदीनंतरही उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती आहे. जाणकारांच्या मते, माशांच्या ''गाबोळी'' (अंडी ) साठी आणि ब्रीडिंगसाठी जो आवश्यक पाऊस न पडल्याने मासे किनारपट्टीकडे फिरकलेले नाहीत.

'मत्स्योद्योग'च्या आदेशाने मच्छीमारांत खळबळ

मत्स्योद्योग विभागाने आता कोणालाही ट्रॉलर बांधण्याची आणि मासेमारी व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिली आहे. यामुळे या क्षेत्रातील अनुभव नसलेले ''पार्ट टाइम'' बिल्डर किंवा धनदांडगे लोक या व्यवसायात शिरकाव करतील आणि पिढ्यानपिढ्या मासेमारी करणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांचे कंबरडे मोडले जाईल, अशी भीती काही मच्छीमारांना वाटते आहे. त्यामुळे नवीन नोंदणी करताना संबंधित मच्छीमार सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करावे,अशी मागणी होत आहे.

पर्वरीत आजपासून मासेमारी बंदी उठली...पण

पर्वरी : जरी आजपासून खोल समुद्रातील मासेमारी सुरु करण्यात आली असली तरी मालीम जेटीवर शुकशुकाट होता. परप्रांतातील कामगार अद्याप न परतल्यामुळे बोट मालक चिंतेत आहेत. बोट मालकांनी आपल्या बोटी रंगरंगोटी नांगरून ठेवल्याचे दृश्य जेटीवर दिसत होते. यासंबंधी मांडवी फिशरमेनकोऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी संचालक आणि बोटमालक संदीप गायक यांनी कामगार गावातून परतले नसल्याची खंत व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news