

पणजी ः जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केले आहे. 50 जिल्हा पंचायत जागापैकी तब्बल 32 जागा महिला, ओबीसी, एसटी व एससीसाठी रीखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यमान सदस्यांसह अनेक इच्छुकांची संधी गेली आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवार घोषित करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता पक्षांच्या कार्यालयांत इच्छुकांची गर्दी वाढली आहे. दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्षाने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
कोणता पक्ष सर्वप्रथम उमेदवार जाहीर करतो, याकडे सर्वांचे लागले आहे. मतदानाला अवघा एक महिना राहिलेला असल्यामुळे आणि काही जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये पाच ते सहा पंचायती येत असल्यामुळे सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रचारासाठी एकमहिना तसा कमीच आहे. त्यामुळे त्वरित उमेदवार घोषित झाले तर उमेदवारांच्या ते फायद्याचे ठरू शकते. 2020 च्या जि.पं. निवडणुकीवेळी 50 पैकी जवळजवळ 46 मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे समर्थक निवडून आलेले आहेत, मात्र आरक्षणामुळे त्यातील अनेकांना उमेदवारी मिळणे कठीण झाले आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष धाकू मडकईकर यांचा सेंट लॉरेन्स हा मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव झालेला असल्यामुळे त्यांना इतर मतदारसंघ शोधावा लागला आहे. त्याचबरोबर अनेकांचे मतदारसंघ राखीव झाले असल्यामुळे त्यांना पुढील पाच वर्षे थांबावे लागणार आहे. त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांची चाचपणी आम्ही यापूर्वी सुरू केली होती. आरक्षणाची वाट पहात होतो. आता आरक्षण जाहीर झालेले असले तरी अधिसूचना जाहीर होताच उमेदवार जाहीर करू असे नाईक यांनी सांगितले. भाजपची राज्य समिती, निवडणूक समिती चर्चा करून इच्छुक उमेदवारांची छाननी करून उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगून काम करणाऱ्यांना आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाने शनिवारी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या मये येथील प्रा. राधिका राजेश कळंगुटकर यांचे नाव चोडण जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून जाहीर केले. गोवा फॉरवॉर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी प्रा. राधिका कळंगुटकर यांना पक्ष जिल्हा पंचायतीची उमेदवारी चोडण मतदारसंघातून देत असल्याचे सांगून जि. पं. निवडणुकीतील पहिला उमेदवार जाहीर केला.