

पणजी : पणजी शहरातील काही असुरक्षित इमारती आणि घरांना धोकादायक घोषित करून ती पाडण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी काही इमारतींचे मालक किंवा रहिवासी न्यायालयात गेल्यामुळे कारवाईत अडथळे निर्माण होत आहेत. गंभीर बाब म्हणजे, १८ पेक्षा अधिक धोकादायक इमारती म्हणून फलक लावण्यात आलेल्या काही इमारतींमध्ये आजही दुकाने, कार्यालये सुरू असून काही ठिकाणी लोक वास्तव्यास आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गोवा मुक्तीनंतर पणजीत उभारण्यात आलेली पहिली सातमजली प्रशासकीय इमारत ‘जुन्ता हाऊस’ राहण्यासाठी धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर ती रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या इमारतीतील बहुतांश सरकारी कार्यालये अन्यत्र हलवण्यात आली असली, तरी काही खात्यांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने त्यांची कार्यालये अजूनही त्याच इमारतीत सुरू आहेत. याच इमारतीखालील खाजगी दुकानदारांनी पर्यायी जागा मिळेपर्यंत दुकाने खाली करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पणजीतील जुने सरकारी गॅरेज तसेच सांतिनेज येथील सदनिका इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. गोमंतक मराठा सभागृहाजवळील एक इमारतवजा घरही धोकादायक स्थितीत आहे. सांतिनेज येथील एका इमारतीवर धोकादायक इमारतीचा फलक लावलेला असतानाही त्यामध्ये रेस्टॉरंट सुरू असल्याचे दिसून येते. अशा प्रकारच्या अनेक घटना राजधानी पणजीत आढळत आहेत.