Panaji CCP Election Results 2026 | मोन्सेरातांचा विरोधकांना दे धक्का

अधिक जागा जिंकून दाखवून दिले महापालिकेवरील वर्चस्व
Panaji Municipal Election Result 2026
Panaji Municipal Election Result 2026
Published on
Updated on

विलास महाडिक

पणजी : ही निवडणूक वर्ष असल्याने पणजी महापालिकेची निवडणूक ही पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यासाठी प्रतिष्ठेची तसेच महत्त्वाची होती. या निवडणुकीत भाजपचे मंत्री अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनेलने उत्पल परीकर नेतृत्वाखालील आम्ही पणजीकर पॅनेलचा धुव्वा उडविला. सलग पाचव्यांदा त्यांचे पॅनेल निवडून आणताना मागील निवडणुकीपेक्षा यावेळी दोन जागा अधिक मिळाल्याने मंत्री मोन्सेरात यांनी पणजीवरील वर्चस्व सिद्ध केले आहे.

या निवडणुकीत पणजीतील मतदार मतदानाचा हक्क बजावताना काही धक्कादायक निकाल देतील, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, मंत्री मोन्सेरात यांनी एकवटलेल्या विरोधी आघाडीला धक्का दिला आहे. ही आघाडी भाजप समर्थक पॅनेलचा पराभव करू शकली नाही. मागील निवडणुकीपेक्षा दोन जागा यावेळी अधिक मिळाल्याने मंत्री मोन्सेरात यांचे मनोबल वाढले आहे. आगामी विधानसभेत पणजीत मंत्री मोन्सेरात यांचे वर्चस्व राहणार हे या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे.

काही महिन्यापूर्वी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीतही भाजपने विरोधकांना भुईसपाट केले होते. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत ही परंपरा कायम ठेवण्यात भाजपला यश आले आहे. आगामी पालिका निवडणुकीतही भाजप समर्थक उमेदवार अधिकाधिक निवडून आणून सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांना काम सोपे होणार आहे. राज्यातील होणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना डोके वर करण्याची संधी कदापि सत्ताधारी भाजप देणार नाही हे मात्र नक्की.

गेल्या ५ वर्षात स्मार्ट सिटी योजनेतून झालेल्या प्रकल्पाच्या कामावेळी पणजीकर मतदारांना बऱ्याच समस्या व त्रासाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्याचा परिणाम निवडणुकीतील मतदानावर झालेला नाही हे एकंदर दिसून आले. त्यांच्या पॅनेलचे २५ उमेदवार विजयी झाले यावरून पणजी महापालिकेने केलेल्या कामांची पोचपावती आहे असेच म्हणावे लागेल. पणजी शहरात पावसाळ्यात तुडुंब यायची. मात्र, गेल्या दोन वर्षात पाहिले तर पणजी शहरात कोठेच रस्ते पाण्यासाठी गेलेले दिसले नाहीत. यावरून मागील महापालिका मंडळाने स्मार्ट सिटी योजनेखाली केलेल्या कामांमुळे ते शक्य झाले होते. त्याचा फायदाही मंत्री मोन्सेरात यांच्या पॅनेलला झाला.

माजी केंद्रीयमंत्री तथा मुख्यमंत्री मनोहर परीकर यांचे सुपुत्र उत्पल परीकर पणजी शहरात आपला ठसा उमटवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, पणजी महापालिका निवडणुकीत त्यांच्या पॅनेलची जी धुळधाण झाली ते पाहता पणजी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवून ते कितपत यशस्वी ठरतील, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या पॅनेलमध्ये असलेले उमेदवार हे नवोदित होते. त्यातील अनेकजणांना राजकारणाचा अनुभव नव्हता, तसेच ते कधी समाजकारणात काम करताना दिसलेले नव्हते. त्यामुळे अनेक मतदार या उमेदवारांना ओळखत नव्हते. या निवडणुकीत प्रभाग फेररचना तसेच आरक्षणाचा फटका परीकर यांच्या पॅनेलला बसला हे सुद्धा कारण असू शकते.

गेली अनेक वर्षे पणजी महापालिका निवडणुकीत निवडून येणारे माजी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो हे पराभूत झाले हा मोठा धक्का म्हणावा लागेल. आरक्षण बदल व फेररचनेमुळे त्याचा फटका त्यांनाही बसला. एक थोडासा दिलासा त्यांना मिळाला तो म्हणजे त्यांचे पुत्र लिओनार्ड फुर्तादो निवडून आले. त्यांनी पराभूत झाल्यानंतर त्यामागील कोणतीही प्रतिक्रिया न देता मतमोजणी केंद्रावरून ते निघून गेले. सुरेंद्र फुर्तादो, उत्पल परीकर व दत्तप्रसाद नाईक यांनी एकत्रित येऊन व विरोधी राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा देऊनही मंत्री मोन्सेरात यांच्या पॅनेलचा पराभव करू शकले नाही. यामुळे मोन्सेरात यांची पणजीतील ताकद वाढली आहे. त्यांना टक्कर देणे कोणीही नाही असेच चित्र सध्या दिसू लागले आहे.

पणजी पालिका निवडणुकीत मंत्री मोन्सेरात यांनी जुने व नवे असे मिश्रण करून उमेदवार निवडले होते. त्याचा फायदाही त्यांना झाला. जे नवे चेहरे होते त्यांचे त्या प्रभागात असलेल्या मतदारांचा प्रतिसाद बघूनच उमेदवारी दिली होती. त्यांचा असलेला पाठिंबा यामुळे नवोदित उमेदवारही जिंकून आले. यावेळी मोन्सेरात हे प्रचारासाठी बाहेर पडले नाहीत. त्यांनी उमेदवारांनाच कामाला लावले. दारोदारी प्रचार करण्याचा हुकूमच काढला होता. त्याचा फायदा या उमेदवारांनाच झाला. त्यामुळे मंत्री मोन्सेरात यांचे उमेदवार कोण हे मतदारांना कळले.

या निवडणुकीत मंत्री मोन्सेरात यांचे अनेक प्रभागातील वर्चस्व तसेच मतदानाच्या पूर्वसंध्येला अनेक प्रभागांमध्ये एम टॉनिकचा वापर झाला. त्यामुळे ज्या ठिकाणी अटीतटीच्या लढती अपेक्षित होत्या, तेथील चित्रही पालटले. प्रतिस्पर्थ्यांनीही मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र, एम टॉनिक पुढे काही चालले नाही. काही प्रभागात आम्ही पणजीकर पॅनेलच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. मोन्सेरात यांचे पॅनेल पाहण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न झाले आहेत. २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी महापालिकेत वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरले होते. या निकालानंतर स्पष्ट झाले आहे की पणजीत एकवटलेली विरोधी आघाडीही भाजपचा पराभव करू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news