पणजी : गोव्यात पर्यावरण विषयक जागरूकता आणि प्रेरणादायी कृती करण्याच्या उद्देशाने विश्व प्रकृती निधी संस्थेने 'मिरामार डायलॉग्स' नावीन्यपूर्ण आणि अनोखी आठ आठवड्यांची मालिका सुरू केल्याची माहिती संस्थेचे समन्वयक आदित्य काकोडकर यांनी दिली. या मालिकेची सुरुवात म्हादई संवादावरून गुरुवारी १२ रोजी मीरामार सायन्स सेंटरजवळील कार्यालयात होत आहे.
काकोडकर म्हणाले, हा उपक्रम राज्याच्या जैवविविधता, संवर्धन प्रयत्न आणि शाश्वत विकासावर परिणाम करणाऱ्या गंभीर पर्यावरणीय समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी नागरिक, तज्ज्ञ आणि विचारवंतांना एकत्र येण्यासाठीचा आहे. समृद्ध नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याला पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. विशिष्ट पर्यावरणीय समस्यांना समर्पित असंख्य संस्था असताना हे एकत्रित व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. उद्घाटनावेळी ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांचे मुख्य बीजभाषण होईल. हे सत्र निसर्ग अभ्यासक निर्मल कुलकर्णी संचलित करतील. विश्व प्रकृती निधी-इंडिया गोव्यात ३९ वर्षांहून अधिक काळ सक्रियपणे कार्यरत आहे. राज्याच्या नैसर्गिक वारशाचे रक्षण करण्यासाठी अधिक जागरूकता, सहयोग आणि सामूहिक कृतीची गरज ओळखते.
मिरामार डायलॉग्समध्ये साप्ताहिक सत्रे असतील जी दोन भागांत विभागली जातील : प्रमुख पर्यावरण तज्ज्ञांची विषयावर आधारित मुलाखत, त्यानंतर श्रोत्यांशी संवादी चर्चा. या संवादाचा उद्देश गोव्याला भेडसावणाऱ्या पर्यावरणीय आव्हानांची सर्वसमावेशक समज प्रदान करणे, तसेच व्यावहारिक उपाय शोधणे हा आहे.