Goa news | शिवोली-आसगाव रस्त्यावर मध्यरात्री वृक्षतोड

'गोवा ग्रीन ब्रिगेड'कडून निषेध; उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन?
Tree Cutting
Tree CuttingPudhari
Published on
Updated on

पणजी : शिवोली-आसगाव रस्त्यावरील सोरो जंक्शन येथे २०० वर्षांहून अधिक जुन्या वारसा दोन वृक्षांची मध्यरात्री तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप 'गोवा ग्रीन ब्रिगेड' या संस्थेने करून तीव्र निषेध नोंदवला आहे.

संस्थेच्या म्हणण्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शिवोली-आसगाव रस्त्यावर वृक्षतोडीवर स्थगिती दिली असतानाही मंगळवार (१३ एप्रिल) मध्यरात्री गुप्त कारवाईत दोन मोठ्या वारसा वृक्षांची तोड करण्यात आली. यात एक कापूस (कॉटन ट्री) आणि एक शिवण (व्हाईट टीक) वृक्षाचा समावेश असल्याचा दावा संस्थेने केला आहे. वन विभागाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) यांनी केलेल्या तपासणीत प्रत्येक झाडाचा घेर सुमारे २.५ ते २.८ मीटर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तोडलेले लाकूड १० टनांहून अधिक क्षमतेच्या चार ट्रकमधून वाहून नेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कँडल लाईट आंदोलनाची आठवण

संस्थेने आठवण करून दिली की, मार्च २०२४ मध्ये याच रस्त्यावर प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात ८ दिवसांचे कँडल लाईट आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी एकूण १३१ वारसा वृक्ष तोडण्याची योजना होती. त्यापैकी १०० झाडे वाचवण्यात यश आले, तर ३१ झाडे तोडण्यात आली होती. आता पुन्हा दोन झाडांची तोड झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेबाबत संशयाची सुई कळंगुट मतदारसंघाच्या आमदाराकडे वळत असल्याचा आरोप संस्थेने केला असून, त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. गोवा ग्रीन ब्रिगेडने सांगितले की, हे वारसा वृक्ष केवळ सावली व ऑक्सिजन देत नाहीत, तर विविध पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक आणि सूक्ष्मजीवांसाठी महत्त्वाचे अधिवास आहेत. त्यामुळे अशा प्रकारची बेकायदेशीर वृक्षतोड थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news