

पणजी : ओंकार हत्तीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठविण्यासंदर्भातील याचिकेवर शुक्रवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचसमोर सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने पुन्हा एकदा सिंधुदुर्ग वन विभागाला येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत परिपूर्ण प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे घाईघाईने ओंकारला पकडून वनतारात पाठवण्याचा वन विभागाचा मनसुबा धुळीला मिळाला आहे.वन्यजीवप्रेमी रोहित कांबळे यांनी ओंकारला पकडून वनतारात धाडण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे.
सुनावणीदरम्यान ओंकारला पकडून वनतारामध्ये पाठवणार असल्याची कबुली मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग वन विभागाने न्यायालयासमोर दिली होती. त्यावर न्यायालयाने बुधवारी, 5 रोजी पार पडणाऱ्या सुनावणीमध्ये यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा सूचना वन विभागाला दिल्या होत्या.
वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ओंकारला अंगावर फटाके टाकून आणि काठ्यांनी मारहाण करून चिथावणी देत आहे. यामुळे हा सगळा प्रकार असंवेदनशीलपणे पाहणाऱ्या उपवनसंरक्षकांवर आणि ओंकारला अमानुष वागणूक देणाऱ्या व बेजबाबदारींने वागणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर पण गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी होत आहे.