पणजी : जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या (डीआरएससी) देखरेख कक्षाने केलेल्या संयुक्त तपासणीत बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजसमोर (गोमँको) भुयारी मार्ग, सेवा रस्ते आणि बस थांब्यांवर सुरक्षिततेत त्रुटी आणि पायाभूत सुविधांमधील कमतरता आढळून आल्या आहेत. संबंधित प्रत्येक खात्याला उपाययोजनांचे नकाशे आणि देखभाल नियमावली पुढील आढावा बैठकीवेळी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम खाते, निवासी डॉक्टर आणि स्थानिक पंचायत प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केलेल्या तपासणीत, वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे पादचारी आणि वाहनांसाठीचे भुयारी मार्ग खराब स्थितीत असल्याचे, प्रकाशयोजना अकार्यक्षम असल्याचे आणि बससाठी निश्चित केलेल्या थांब्यांवर अनधिकृत पार्किंग असल्याचे आढळले.
भुयारी मार्गात उघड्या लटकलेल्या तारा व तुंबलेली उघडी गटारे, डासांच्या प्रजननाचे संभाव्य ठिकाण बनले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या १३ ऑक्टोबर, २०१५ च्या आदेशानुसार प्रकाशयोजना आणि देखभालीची नियमावली असणे अनिवार्यतेवर आधारित अनुपालन अहवाल तयार करा, असे गोवार्कनचे संयोजक रोलँड मार्टिन्स यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
२२ एप्रिल रोजी नियोजित असलेल्या आढावा बैठकीपूर्वी विभागांना अधिकारक्षेत्राचे नकाशे आणि देखभाल नियमावली सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुधारणांची अंमलबजावणी झाली आहे याची खात्री करण्यासाठी दर १५ दिवसांनी पाठपुरावा तपासणी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या आढळल्या समस्या
या तपासणीवेळी विविध खात्याच्या अधिकारक्षेत्राचे मुद्दे देखील निदर्शनास आणण्यात आले. तुंबलेली गटारे डासांच्या प्रजननाची संभाव्य ठिकाणे बनल्याचे मार्टिन्स म्हणाले. या तपासणीत रुग्णालय परिसरातील आग प्रतिबंधक उपाययोजना आणि कचरा व्यवस्थापनाचाही आढावा घेण्यात आला. उघड्यावर पडलेल्या विद्युत तारा आणि विभागीय जबाबदाऱ्यांबाबत स्पष्टतेचा अभाव, या इतर समस्या आढळून आल्या.