

पणजी : राज्यात मान्सूनोत्तर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व धरणे नोव्हेंबरमध्येही तुडुंब भरलेली आहेत. धरणांमध्ये नोव्हेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाणीसाठी आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता नाही.
साधारणपणे, जलस्रोत खाते नोव्हेंबरमध्ये सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेते. मात्र, यावर्षी गोव्यात २४ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत सतत पाऊस पडल. हा दशकातील सर्वात जास्त पाऊस आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा वापर सिंचनासाठी क्वचित करावा लागणार आहे. जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूननंतर सलग पाऊस पडत राहिल्यामुळे माती ओलसर राहिली. त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते.
दक्षिण गोव्यातील बहुतेक लोकांच्या गरजा पूर्ण करणारा सांगे तालुक्यातील उगे येथील साळावली धरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही १०१ टक्के भरला आहे. त्याचप्रमाणे, सत्तरी तालुक्यातील केरी येथील अंजुणे धरणात ९९ टक्के जलसाठा आहे. काणकोण तालुक्यातील चापोली आणि गवाणे धरणे १०० टक्के क्षमतेपर्यंत भरली आहेत, तर शिरोडातील पंचवाडी तथा म्हैसाळ धरण १०० टक्के भरलेले असून शिरोडा आणि आसपासच्या परिसरातील गरजा ते पूर्ण करणारे आहे. डिचोली तालुक्यातील आमठाणे धरण ७१ टक्केभरले आहे. दरवाज्यांची दुरुस्ती करण्यासाठी हे धरण रिकामे करण्यात आले होते. दोडामार्ग तालुक्यातील तिळारी धरण देखील सध्या १०० टक्के भरले आहे.