

मडगाव : वैद्यकीय आणि औद्योगिक स्वरूपाच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास असमर्थ ठरलेल्या आस्थापनांनी पुन्हा मोर्चा ग्रामीण भागातील ओसाड पडलेल्या खाणींकडे वळवला आहे. चानीमळ कष्टी येथील चिरे खाणीत हजारो टन औद्योगिक व वैद्यकीय कचरा टाकून त्याला आग लावण्याच्या घटनेला ८ महिने पूर्ण होऊन सुद्धा प्रशासनाला संबंधितांवर कारवाई करता आलेली नाही. त्यात तो कचरा तेथून हलवण्याचे आश्वासन देणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी ऐनवेळी हात वर केले. त्यामुळे कष्टीसह आजूबाजूच्या गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत प्रदूषित होण्याचा प्रकार ताजा असताना पुन्हा एकदा त्याच खाणीत औद्योगिक कचरा टाकून त्याला आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
गुरुवारी समोर आलेल्या या घटनेनंतर कष्टीसह चानीमळ व आजूबाजूच्या गावांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यंदाही आम्हाला जीव वाचवण्यासाठी गाव सोडून दुसरीकडे पळावे लागणार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सांगेला लागून असलेल्या चानीमळ या कृषी समृद्ध गावातील जुन्या चिरे खाणीत औद्योगिक कचऱ्याला आग लावण्यात आली होती. त्या आगीचे दुष्परिणाम ग्रामस्थांना भोगावे लागले होते. लोकांच्या आरोग्यावर त्या धुराचे परिणाम होऊ लागल्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून लोकांना काही काळासाठी आपला गाव सोडावा लागला होता. या प्रकरणात पोलिसांनी एका स्थानिक व्यक्तीला अटक देखील केली होती; पण या प्रकाराला आळा घालणे पोलिसांनाही शक्य झालेले नाही.
सविस्तर माहितीनुसार, कष्टी आणि चानीमळ या गावांमध्ये पूर्वी अनेक बेकायदेशीर चिऱ्यांच्या खाणी चालत होत्या. चिऱ्याचे दगड संपल्यानंतर या खाणी तशाच ओसाड ठेवण्यात आल्या. कित्येक मीटर खोल असलेल्या या खाणींमध्ये पावसाचे पाणी साचून धोकादायक हौद तयार झाले आहेत. साधारणतः त्या खाणींकडे कोणी फिरकत नाहीत. त्याचाच फायदा उठवत काही स्थानिकांना हाताशी धरून कुडचडे, वेर्णा अशा भागातील औद्योगिक वसाहतींचा कचरा त्यात टाकला जात आहे. गेल्या मे महिन्यात चानीमळ येथील चिऱ्यांच्या खाणीत दुप्पटपणे भरलेल्या कचऱ्याला आग लावण्यात आली होती. पोलिसांच्या कारवाईनंतरही संबंधित व्यक्तीने पुन्हा तो कचरा खाणीत टाकून त्या कचऱ्याला आग लावल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
बाहेरचा औद्योगिक आणि वैद्यकीय कचरा गावात आणून जाळला जाऊ नये, असे ठराव स्थानिक पंचायतीने कित्येक वेळा घेतले आहेत. संबंधित व्यक्तीवर सांगे पोलीस स्थानकावर गुन्हा दाखल केला गेला आहे. स्थानिक पंचायतीने तर त्याला २० हजार रुपयांचा दंडही ठरवला. मात्र, कायद्याला वाकुल्या दाखवणाऱ्या त्या व्यक्तीने ना दंड फेडला; ना पंचायतीला अजून चेहरा दाखवला आहे, अशी माहिती ज्ञानेश्वर नाईक यांनी दिली.
खाणीचा एक संपूर्ण हौद कचऱ्याने भरलेला आहे, तर अन्य एका हौदात अर्धवट जळालेला कचरा तसाच बाकी आहे. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल, असे आश्वासन देणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपले हात वर करत गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे बोट दाखवले आहे तर मंडळाने आपली जबाबदारी झटकत स्थानिक पंचायतीवर तो कचरा काढण्याचा भार सोपवला. मात्र, पंचायतीने निधी नसल्याचे सांगून तो कचरा काढण्यास नकार दिला. त्यामुळे आता कचरा कोणी काढावा, असा प्रश्न निर्माण झाला असून त्या रासायनिक स्वरूपाच्या कचऱ्याचे पाणी जमिनीत मुरत चालल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत प्रदूषित होण्याच्या मार्गावर आहे.
गुरुवारी चिऱ्यांच्या खाणीतून मोठ्या प्रमाणावर धुरीचे लोट उठताना दिसून आले.
ग्रामस्थांनी जाऊन पाहणी केली असता कचऱ्याने भरलेल्या खाणींच्या हौदात आग पेटत होती.
धुळीमुळे संपूर्ण परिसर काळाकुट्ट झाला. रसायनाचा वास गावात पसरू लागला.
माहिती मिळताच कुडचडेच्या अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
ग्रामस्थ ज्ञानेश्वर नाईक यांनी सदर प्रकाराला प्रशासन जबाबदार आहे, अशी टीका केली. मे महिन्यात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर आम्हाला घर सोडून नातेवाईकांच्या घरी जाण्याची वेळ आली. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आता सुद्धा आमच्यावर तीच वेळ येणार आहे, असे ते म्हणाले.