

पणजी : गोव्याला परमेश्वराने नैसर्गिक सौंदर्य दिलेले आहे. गोवा ही केवळ पाश्चात्य संस्कृतीची भूमी नाही, तर ही दैवी भूमी आहे. येथे आयुर्वेद व वेलनेस पर्यटनाला मोठा वाव आहे. योग व आयुर्वेद एखाद्या धर्माशी संबंधित नाही, ती सगळ्यांचे जीवन समृद्ध करणारी पद्धती आहे, असे प्रतिपादन पतंजली योगपीठाचे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांनी केले.
बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये शुक्रवारपासून राज्य सरकार व गोवा काऊन्सिल ऑफ आयुर्वेद यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय इंडिया इंटरनॅशनल आयुर्वेद वेलनेस एक्स्पोचे उद्द्घाटन सोहळ्यामध्ये आचार्य बालकृष्ण बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, पी. के. प्रजापती, मुख्य सचिव डॉ. व्ही कांडावेलू, गोवा चेंबरच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड, पद्मश्री डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. स्नेहा भागवत आदी उपस्थित होते.
आचार्य बालकृष्ण म्हणाले, काहीजण योग व आयुर्वेद यांना धर्माचे लेबल लावतात ते योग्य नाही. योग माणसाच्या कल्याणासाठी, सर्वांना सुखी करण्याचा संदेश देणारे आहे. निसर्गाला देव मानून सेवेसाठी आयुर्वेद उपचार करण्याचे सत्र सर्वांनी सुरू केले आहे. ही सनातन पद्धती आहे ती आपल्या मूळ तत्त्वाला जोडणारी असल्याचे बाळकृष्ण म्हणाले. गोव्यात रक्तशर्करा वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी सावध रहावे, आपल्या जीवनामध्ये आयुर्वेद आणि योगाला जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाची ओळख जगभरामध्ये केली असून त्याचा प्रभाव आता जाणवू लागलेला आहे. आयुर्वेद प्राचीन उपचार परंपरा आहे. संशोधनातून ही सिद्ध झालेले आहे. जगभरामध्ये ९६५ मिलियम प्रेक्टीसर्स आयुर्वेदाद्वारे उपचार करत असून जगामध्ये उपचाराचा ज्या एकूण ११ पद्धती आहेत त्यातील ६ पद्धती या भारतामधील असल्याचे सांगून त्यामध्ये आयुर्वेद, युनानी, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, सिध्दा व पंचकर्म यांचा समावेश असल्याचे बालकृष्ण म्हणाले.
गोवा होलिस्टिक वेलनेस ग्लोबल हब बनविणार : मुख्यमंत्री डॉ. सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याचे आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी योग जगभर केला आणि आता जगातील करोडो लोक योग करत आहेत. येत्या काळामध्ये आयुर्वेद आणि वेलनेस उपचार घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात येतील या दिशेने गोव्यात सरकारचे काम सुरू आहे. गोवा हे होलिएस्टिक वेलनेस ग्लोबल हब व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. जगात बदल होत असताना बदलती जीवनपद्धती, मानसिक ताण यामुळे जीवन त्रासदायी होत असताना योग आणि आयुर्वेद हे त्रास दर करण्याचे काम करत आहे. गोव्यातील आयुष केंद्रातून सिद्धा, युनानी, आयुर्वेद, पंचकर्म आदी उपचार पद्धतीच्या माध्यमातून आयुर्वेद आणि योगाचे प्रसार होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.